एस्तेर ५:१-१४
५ मग तिसऱ्या दिवशी+ एस्तेरने राजवस्त्रं घातली आणि ती राजमहालाच्या आतल्या अंगणात राजकक्षासमोर येऊन उभी राहिली. त्या वेळी राजा आपल्या कक्षात राजासनावर बसला होता. तिथून त्याला राजकक्षाचा दरवाजा स्पष्ट दिसत होता.
२ एस्तेर राणी अंगणात उभी असलेली राजाला दिसली. तिला पाहताच त्याला आनंद झाला आणि त्याने आपल्या हातातला सोन्याचा राजदंड+ तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ येऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला.
३ राजाने तिला विचारलं: “एस्तेर राणी, काय झालं? तुला काय हवंय? तू अर्धं राज्य जरी मागितलंस तरी ते मी तुला देईन.”
४ एस्तेर म्हणाली: “आज मी खास राजासाठी एक मेजवानी ठेवली आहे. राजाची मर्जी असेल तर त्यांनी मेजवानीला यावं आणि हामानलाही+ सोबत आणावं.”
५ तेव्हा राजा आपल्या सेवकांना म्हणाला: “एस्तेर राणीच्या म्हणण्याप्रमाणे करा. जा! आणि हामानला लवकर यायला सांगा.” मग राजा आणि हामान दोघंही एस्तेरने ठेवलेल्या मेजवानीला गेले.
६ नंतर, द्राक्षारस पीत असताना राजाने एस्तेरला विचारलं: “सांग तुला काय हवंय? तू जे मागशील ते तुला मिळेल. अगदी अर्धं राज्य जरी मागितलंस, तरी ते मी तुला देईन. सांग काय हवंय?”+
७ तेव्हा एस्तेर म्हणाली: “माझी अशी विनंती आहे, की
८ जर राजा माझ्यावर प्रसन्न असेल आणि राजाला माझी मागणी पूर्ण करायची इच्छा असेल, तर राजाने उद्या परत हामानसोबत मी ठेवलेल्या मेजवानीला यावं. मग मला काय हवंय ते मी उद्या सांगीन.”
९ त्या दिवशी मेजवानी करून बाहेर पडताना हामान खूप खूश होता; त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण राजमहालाच्या दरवाजाजवळ बसलेल्या मर्दखयला त्याने बघितलं तेव्हा त्याच्या रागाचा पारा चढला. कारण, मर्दखय त्याला पाहून उठून उभा राहिला नाही किंवा त्याला जराही घाबरला नाही.+
१० पण हामानने आपला राग आवरला आणि तो आपल्या घरी निघून गेला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि आपली बायको जेरेश+ हिला बोलावून घेतलं.
११ हामानने त्यांच्यासमोर आपल्या श्रीमंतीची आणि आपल्या अनेक मुलांची+ बढाई मारली. तसंच, राजाने त्याला बढती देऊन इतर सेवकांपेक्षा आणि अधिकाऱ्यांपेक्षा कसं उच्च पद दिलं याचीही तो फुशारकी मारू लागला.+
१२ हामान असंही म्हणाला: “इतकंच काय, एस्तेर राणीने जी मेजवानी ठेवली होती त्यासाठी तिने राजासोबत फक्त मलाच आमंत्रण दिलं होतं.+ आणि उद्याही तिने राजासोबत मला मेजवानीला बोलावलंय.+
१३ पण जोपर्यंत तो यहुदी मर्दखय राजमहालाच्या दरवाजाजवळ बसलाय, तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे.”
१४ तेव्हा त्याची बायको जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्याला म्हणाले: “एक काम कर. ५० हात उंचीचा* एक वधस्तंभ उभा कर आणि त्यावर मर्दखयला लटकवलं जावं+ असं सकाळी राजाला जाऊन सांग. मग खुशाल राजासोबत जा आणि मेजवानीचा आनंद घे.” त्यांची ही कल्पना हामानला आवडली आणि त्याने एक वधस्तंभ तयार करून घेतला.