गणना १९:१-२२

  • लाल गाय आणि शुद्धीकरणाचं पाणी (१-२२)

१९  यहोवा पुन्हा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २  “हा यहोवाने दिलेला नियम आहे: ‘इस्राएली लोकांना सांग, की त्यांनी कोणताही दोष नसलेली+ आणि जिच्यावर कधीही जू* लादलं गेलं नाही, अशी लाल रंगाची एक गाय* तुझ्यासाठी आणावी. ३  तुम्ही ती गाय एलाजार याजकाकडे द्यावी आणि त्याने तिला छावणीबाहेर घेऊन जावं. तिथे त्याच्यादेखत तिला कापलं जावं. ४  मग त्याने तिचं काही रक्‍त आपल्या बोटावर घेऊन ते भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेला सात वेळा शिंपडावं.+ ५  नंतर त्याच्या डोळ्यांसमोर त्या गाईला तिची कातडी, मांस, रक्‍त आणि शेण यांसोबत जाळलं जावं.+ ६  त्यानंतर याजकाने देवदाराचं लाकूड, एजोबची*+ फांदी आणि गडद लाल रंगाचं कापड घ्यावं आणि ज्या आगीत त्या गाईला जाळलं जात आहे, त्यात त्याने हे सर्व टाकावं. ७  मग याजकाने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि त्यानंतर छावणीत यावं. पण तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. ८  गाईला जाळणाऱ्‍यानेही आपले कपडे धुवावेत आणि अंघोळ करावी. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. ९  मग एका शुद्ध माणसाने त्या गाईची राख गोळा करावी+ आणि छावणीबाहेर एका स्वच्छ ठिकाणी ती ठेवावी. इस्राएली लोकांनी ती राख शुद्धीकरणाचं पाणी+ तयार करण्यासाठी ठेवावी. हे एक पापार्पण आहे. १०  राख गोळा करणाऱ्‍याने आपले कपडे धुवावेत आणि तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हा इस्राएली लोकांसाठी आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यासाठी एक कायमचा नियम आहे.+ ११  एखाद्याने कोणत्याही मृतदेहाला स्पर्श केला, तर तो सात दिवस अशुद्ध राहील.+ १२  त्याने तिसऱ्‍या दिवशी त्या पाण्याने स्वतःचं शुद्धीकरण करावं, म्हणजे तो सातव्या दिवशी शुद्ध होईल. पण जर त्याने तिसऱ्‍या दिवशी स्वतःचं शुद्धीकरण केलं नाही, तर तो सातव्या दिवशी शुद्ध होणार नाही. १३  जो कोणी एखाद्या मृतदेहाला स्पर्श केल्यावर स्वतःला शुद्ध करत नाही, तो यहोवाचा उपासना मंडप दूषित करतो+ आणि त्याला ठार मारलं जावं.+ त्याच्यावर शुद्धीकरणाचं पाणी+ शिंपडलं गेलं नव्हतं, म्हणून तो अशुद्ध आहे आणि अशुद्धच राहील. १४  एखादा माणूस तंबूत मेला, तर पुढील नियम पाळावा: जो कोणी त्या तंबूत जातो किंवा जो आधीच त्या तंबूत होता, तो सात दिवस अशुद्ध राहील. १५  झाकण घट्ट न लावलेलं* प्रत्येक उघडं भांडं अशुद्ध असेल.+ १६  बाहेर मैदानात जर कोणीही तलवारीने मेलेल्या माणसाला, किंवा मृतदेहाला, किंवा माणसाच्या हाडाला, किंवा कबरेला स्पर्श केला, तर तो सात दिवस अशुद्ध राहील.+ १७  त्याच्यासाठी, जाळलेल्या पापार्पणातली थोडी राख एका भांड्यात घेऊन त्यावर झऱ्‍याचं ताजं पाणी ओतावं. १८  मग एका शुद्ध माणसाने+ एजोबची फांदी घ्यावी+ आणि ती त्या पाण्यात बुडवून, ते पाणी तंबूवर, त्यातल्या सर्व भांड्यांवर आणि त्या तंबूत जे होते त्या सर्व लोकांवर* शिंपडावं. तसंच, ज्याने हाडाला, किंवा तलवारीने मेलेल्या एखाद्याला, किंवा मृतदेहाला, किंवा कबरेला स्पर्श केला असेल, त्याच्यावर त्याने ते पाणी शिंपडावं. १९  तो शुद्ध माणूस अशुद्ध माणसावर तिसऱ्‍या आणि सातव्या दिवशी ते पाणी शिंपडेल आणि त्याला त्याच्या पापापासून सातव्या दिवशी शुद्ध करेल.+ यानंतर अशुद्ध माणसाने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि संध्याकाळी तो शुद्ध होईल. २०  जो अशुद्ध माणूस स्वतःला शुद्ध करत नाही त्याला ठार मारलं जावं,+ कारण त्याने यहोवाचं पवित्र ठिकाण दूषित केलं आहे. त्याच्यावर शुद्धीकरणाचं पाणी शिंपडण्यात आलं नव्हतं, म्हणून तो अशुद्ध आहे. २१  शुद्धीकरणाचं पाणी+ शिंपडणाऱ्‍याने आपले कपडे धुवावेत. त्या पाण्याला स्पर्श करणारा संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. हा त्यांच्यासाठी एक कायमचा नियम आहे. २२  ज्या वस्तूला अशुद्ध माणूस स्पर्श करेल, ती अशुद्ध होईल आणि तिला स्पर्श करणाराही संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.’”+

तळटीपा

किंवा “कालवड.”
किंवा “ज्याचं झाकण दोरीने बांधलेलं नाही असं.”
किंवा “जिवांवर.”