गणना ३१:१-५४
३१ मग यहोवा मोशेला म्हणाला:
२ “इस्राएली लोकांचा मिद्यानी लोकांकडून+ बदला घे.+ त्यानंतर तू तुझ्या लोकांना जाऊन मिळशील.”*+
३ तेव्हा मोशे लोकांना म्हणाला: “मिद्यानी लोकांशी लढण्यासाठी* आणि यहोवाच्या वतीने मिद्यानकडून बदला घेण्यासाठी, तुमच्यामधून काही माणसांना तयार करा.
४ इस्राएलच्या सर्व वंशांपैकी प्रत्येक वंशातून १,००० माणसांना सैन्यात पाठवा.”
५ तेव्हा, हजारो इस्राएली लोकांमधून+ प्रत्येक वंशातल्या १,००० माणसांना नेमण्यात आलं. अशा प्रकारे, एकूण १२,००० माणसांना लढाईसाठी* तयार करण्यात आलं.
६ मग मोशेने प्रत्येक वंशातून १,००० माणसांना सैन्यात पाठवलं. तसंच, त्याने एलाजार याजकाचा मुलगा फिनहास+ यालाही त्यांच्यासोबत पाठवलं. त्याच्याजवळ पवित्र भांडी आणि युद्धाचा इशारा देण्यासाठी कर्णे+ होते.
७ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी मिद्यानशी युद्ध करून प्रत्येक पुरुषाला ठार मारलं.
८ इतर लोकांसोबतच त्यांनी मिद्यानच्या पाच राजांना, म्हणजेच अवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा यांनाही ठार मारलं. तसंच, त्यांनी बौरचा मुलगा बलाम+ यालाही तलवारीने ठार मारलं.
९ मिद्यानच्या स्त्रियांना व मुलांना इस्राएली लोकांनी बंदी बनवून आपल्यासोबत नेलं. तसंच, त्यांनी त्यांचे सगळे पाळीव प्राणी व गुरंढोरं आणि त्यांची सगळी संपत्ती लुटून नेली.
१० मिद्यानी लोकांची सगळी शहरं आणि छावण्या* त्यांनी जाळून टाकल्या.
११ मग सगळी लूट आणि बंदी बनवलेल्या सर्व माणसांना व जनावरांना घेऊन ते निघाले.
१२ यानंतर, यार्देनच्या काठावर यरीहो इथे मवाबच्या मैदानांत+ छावणीजवळ त्यांनी मोशे, एलाजार याजक आणि सगळ्या इस्राएली लोकांसमोर आपल्यासोबत आणलेले बंदिवान, जनावरं आणि सगळी लूट आणली.
१३ तेव्हा मोशे, एलाजार याजक, तसंच इस्राएली लोकांचे सगळे प्रधान त्यांना भेटायला छावणीबाहेर आले.
१४ पण युद्धावरून परत आलेल्या सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांवर, म्हणजेच हजारांवर आणि शंभरांवर नेमलेल्या प्रमुखांवर मोशे संतापला.
१५ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही सर्व स्त्रियांना का जिवंत राहू दिलं?
१६ बलामच्या सांगण्यावरून पौरच्या बाबतीत,+ त्यांनीच इस्राएली लोकांना यहोवाविरुद्ध अविश्वासूपणे वागायला लावलं होतं!+ आणि म्हणूनच यहोवाच्या लोकांवर पीडा आली होती!+
१७ तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक मुलाला, तसंच, पुरुषाशी संबंध ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका.
१८ पण फक्त कुमारी+ असलेल्या सर्व तरुण मुलींना जिवंत राहू द्या.
१९ तुम्ही सात दिवसांसाठी छावणीबाहेर तळ देऊन राहा. तुमच्यापैकी ज्याने कोणाला ठार मारलंय आणि ज्याने मृतदेहाला स्पर्श केलाय,+ अशा प्रत्येकाने स्वतःला तिसऱ्या आणि सातव्या दिवशी शुद्ध करावं.+ तुम्ही आणि ज्यांना तुम्ही बंदी बनवून आणलंय, त्या सर्वांनी स्वतःला शुद्ध करावं.
२० तसंच तुम्ही प्रत्येक वस्त्र, कातडीची प्रत्येक वस्तू, बकरीच्या केसांपासून बनवलेल्या वस्तू आणि प्रत्येक लाकडी वस्तू यांना पापापासून शुद्ध करा.”
२१ मग एलाजार याजक युद्धावरून परत आलेल्या सैनिकांना म्हणाला, “यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हा नियम आहे:
२२ ‘फक्त सोनं, चांदी, तांबं, लोखंड, पत्रा आणि शिसं,
२३ म्हणजेच आगीने शुद्ध केली जाऊ शकते, अशी प्रत्येक वस्तू तुम्ही आगीत टाकून शुद्ध करा. पण या वस्तू शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध केल्या जाव्यात.+ जी वस्तू आगीत टाकून शुद्ध केली जाऊ शकत नाही, अशी प्रत्येक वस्तू तुम्ही पाण्यात धुऊन घ्या.
२४ सातव्या दिवशी तुम्ही आपले कपडे धुऊन स्वतःला शुद्ध करा आणि त्यानंतर तुम्ही छावणीत येऊ शकता.’”+
२५ मग यहोवा मोशेला म्हणाला:
२६ “लुटीत आणलेल्या वस्तूंची यादी तयार कर आणि सर्व बंदिवानांची आणि जनावरांची मोजणी कर. यासाठी एलाजार याजक आणि इस्राएली लोकांच्या कुळांच्या प्रमुखांनाही सोबत घे.
२७ लुटीत जे काही आणलंय, त्याचे दोन भाग कर. एक भाग युद्धात लढलेल्या सैनिकांना आणि दुसरा भाग बाकीच्या इस्राएली लोकांना वाटून दे.+
२८ युद्धात गेलेल्या सैनिकांकडून तू बंदिवान, गुरंढोरं, गाढवं आणि मेंढरं यांमधून दर पाचशेमागे एक, याप्रमाणे यहोवासाठी कर म्हणून घे.
२९ त्यांच्या वाट्याला आलेल्या अर्ध्या भागातून तू हे घेऊन, एलाजार याजकाला यहोवासाठी दान म्हणून दे.+
३० तसंच, इस्राएली लोकांना दिलेल्या अर्ध्या भागातून तू बंदिवान, गुरंढोरं, गाढवं, मेंढरं, आणि प्रत्येक पाळीव प्राणी यांतून दर पन्नासांमागे एक याप्रमाणे घेऊन, यहोवाच्या उपासना मंडपातली कामं करणाऱ्या लेव्यांना दे.”+
३१ तेव्हा यहोवाने मोशेला ज्या आज्ञा दिल्या होत्या त्याप्रमाणे त्याने आणि एलाजार याजकाने केलं.
३२ युद्धात गेलेल्यांनी लुटीतल्या ज्या वस्तू स्वतःसाठी घेतल्या होत्या, त्यांशिवाय ६,७५,००० मेंढरं,
३३ ७२,००० गुरंढोरं,
३४ आणि ६१,००० गाढवं उरली.
३५ तसंच, ज्यांनी पुरुषाशी संबंध ठेवले नव्हते+ अशा ३२,००० स्त्रियाही होत्या.
३६ युद्धात गेलेल्यांच्या वाट्याला लुटीचा जो अर्धा भाग आला, त्यात ३,३७,५०० मेंढरं होती.
३७ त्यांपैकी ६७५ मेंढरं यहोवासाठी कर म्हणून देण्यात आली.
३८ तसंच त्यात ३६,००० गुरंढोरं होती आणि त्यांपैकी ७२ गुरंढोरं यहोवासाठी कर म्हणून देण्यात आली.
३९ शिवाय, त्यात ३०,५०० गाढवंही होती आणि त्यांपैकी ६१ गाढवं यहोवासाठी कर म्हणून देण्यात आली.
४० या सर्वांसोबतच १६,००० माणसंही होती आणि त्यांपैकी ३२ जणांना यहोवासाठी कर म्हणून देण्यात आलं.
४१ मग, यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हा सगळा कर एलाजार याजकाला,+ यहोवासाठी दान म्हणून दिला.
४२ मोशेने युद्धात गेलेल्या सैनिकांना लुटीतला अर्धा भाग दिल्यावर, इस्राएली लोकांच्या वाट्याला जो अर्धा भाग आला,
४३ त्यात ३,३७,५०० मेंढरं,
४४ ३६,००० गुरंढोरं,
४५ ३०,५०० गाढवं,
४६ आणि १६,००० माणसं होती.
४७ मग यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे, मोशेने इस्राएली लोकांच्या वाट्याला आलेल्या अर्ध्या भागातून माणसं आणि जनावरं यांपैकी दर पन्नासांमागे एक याप्रमाणे घेऊन, यहोवाच्या उपासना मंडपातली कामं+ करणाऱ्या लेव्यांना ती दिली.+
४८ मग सैन्यदलांचे* अधिकारी,+ म्हणजेच हजारांवर आणि शंभरांवर नेमलेले प्रमुख मोशेकडे आले,
४९ आणि त्याला म्हणाले: “तुझ्या या सेवकांनी आपल्या अधिकाराखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आहे आणि त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही.+
५० म्हणून आमच्यापैकी प्रत्येकाला सोन्याच्या ज्या वस्तू मिळाल्या आहेत, म्हणजे पैंजण, बांगड्या, मुद्रेच्या अंगठ्या, कानातले आणि इतर दागिने, त्या तू आमच्याकडून यहोवासाठी दान म्हणून स्वीकार, म्हणजे आम्हाला स्वतःसाठी* यहोवासमोर प्रायश्चित्त करता येईल.”
५१ तेव्हा मोशेने आणि एलाजार याजकाने त्यांच्याकडून सोनं आणि सगळे दागिने स्वीकारले.
५२ हजारांवर आणि शंभरांवर नेमलेल्या प्रमुखांनी एकूण १६,७५० शेकेल* सोनं यहोवासाठी दान म्हणून दिलं.
५३ सैन्यातल्या माणसांपैकी प्रत्येकाने आपल्यासाठी लुटीतल्या वस्तू घेतल्या होत्या.
५४ मोशेने आणि एलाजार याजकाने हजारांवर आणि शंभरांवर नेमलेल्या प्रमुखांकडून सोनं स्वीकारलं आणि ते यहोवासमोर इस्राएली लोकांसाठी आठवण* म्हणून भेटमंडपात आणलं.
तळटीपा
^ काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.
^ किंवा “लढणाऱ्या सैन्यासाठी.”
^ किंवा “सैन्यासाठी.”
^ किंवा “सभोवती भिंती असलेल्या छावण्या.”
^ शब्दशः “एकेक हजाराचे गट.”
^ किंवा “आमच्या जिवांसाठी.”
^ किंवा “स्मारक.”