गणना ३६:१-१३

  • वारसा मिळालेल्या मुलींच्या लग्नाबद्दल नियम (१-१३)

३६  मग गिलादच्या वंशातल्या घराण्यांचे प्रमुख हे मोशे, इस्राएली लोकांचे प्रधान आणि त्यांच्या घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे आले. गिलाद हा माखीरचा मुलगा+ होता आणि माखीर हा योसेफच्या मुलांच्या घराण्यांपैकी मनश्‍शेचा मुलगा होता. २  ते म्हणाले: “माझ्या प्रभू, यहोवाने तुला देशाची जमीन चिठ्ठ्या टाकून इस्राएली लोकांमध्ये वाटून देण्याची आज्ञा दिली होती;+ आणि आमचा भाऊ सलाफहाद याच्या वारशाची जमीन, त्याच्या मुलींना देण्याची आज्ञा यहोवाने तुला दिली होती.+ ३  जर त्यांनी इस्राएलच्या दुसऱ्‍या वंशातल्या माणसांशी लग्न केलं, तर त्या मुलींचा वारसा आमच्या वाडवडिलांच्या वारशातून कमी होईल आणि ज्या वंशात त्यांचं लग्न होईल, त्या वंशाच्या वारशाचा तो भाग होईल; म्हणजे, चिठ्ठ्या टाकून जो वारसा आम्हाला मिळाला होता, त्यातून तो कमी होईल. ४  मग इस्राएली लोकांचं सुटकेचं वर्ष*+ येईल, तेव्हा त्या मुलींचा वारसा, त्यांचं लग्न ज्या वंशात झालं असेल त्या वंशाच्या कायमच्या मालकीचा होईल; म्हणजे, त्यांचा वारसा आमच्या वाडवडिलांच्या वंशाच्या वारशातून कमी होईल.” ५  तेव्हा मोशेने यहोवाच्या आदेशाप्रमाणे इस्राएली लोकांना अशी आज्ञा दिली: “योसेफच्या मुलांच्या वंशजांचं म्हणणं बरोबर आहे. ६  सलाफहादच्या मुलींच्या बाबतीत यहोवाने अशी आज्ञा दिली आहे: ‘त्यांना आवडेल त्या पुरुषाशी त्या लग्न करू शकतात. पण, तो त्यांच्या पित्याच्या वंशातल्या एखाद्या घराण्याचा असला पाहिजे. ७  इस्राएली लोकांचा वारसा एका वंशातून दुसऱ्‍या वंशात जाऊ नये. सर्व इस्राएली लोकांनी आपापल्या वाडवडिलांच्या वंशाचा वारसा आपल्याजवळच ठेवावा. ८  आणि कोणत्याही मुलीला इस्राएलच्या वंशांत वारसा मिळाला असेल, तर तिने आपल्याच वडिलाच्या वंशातल्या पुरुषाशी लग्न करावं.+ यामुळे, इस्राएली लोकांना आपल्या वाडवडिलांच्या वारशावर त्यांचा हक्क टिकवून ठेवता येईल. ९  वारशाच्या जमिनी एका वंशातून दुसऱ्‍या वंशात जाऊ नयेत. सर्व इस्राएली वंशांनी आपापला वारसा आपल्याजवळच ठेवावा.’” १०  यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच सलाफहादच्या मुलींनी केलं.+ ११  महला, तिरसा, होग्ला, मिल्का आणि नोआ या सलाफहादच्या मुलींनी+ आपल्या वडिलांच्या भावांच्या मुलांशी लग्न केलं. १२  आपला वारसा आपल्या वडिलांच्या घराण्याच्या वंशातच राहावा, म्हणून त्यांनी योसेफचा मुलगा मनश्‍शे याच्या घराण्यातल्या पुरुषांशी लग्न केलं. १३  यहोवाने मोशेकडून इस्राएली लोकांना, यार्देनच्या काठावर यरीहो इथे मवाबच्या मैदानांत या सर्व आज्ञा आणि न्याय-निर्णय दिले.+

तळटीपा

किंवा “योबेल वर्ष.”