गणना ८:१-२६

  • अहरोन सात दिवे पेटवतो (१-४)

  • लेव्यांचं शुद्धीकरण, सेवेची सुरुवात (५-२२)

  • सेवा करण्यासाठी लेव्यांना वयोमर्यादा (२३-२६)

 यहोवा मोशेला म्हणाला: २  “अहरोनला सांग, ‘तू दिवे पेटवशील, तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या समोर पडला पाहिजे.’”+ ३  तेव्हा यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनने केलं. त्याने दीपवृक्षाच्या+ समोरच्या बाजूला प्रकाश पडावा अशा प्रकारे दिवे पेटवले. ४  दीपवृक्ष सोन्याचा होता आणि तो बुंध्यापासून पाकळ्यांपर्यंत संपूर्णपणे हातोडीने ठोकून बनवण्यात आला होता.+ यहोवाने मोशेला दृष्टान्तात दाखवल्याप्रमाणेच+ तो तयार करण्यात आला होता. ५  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ६  “इस्राएली लोकांमधून लेव्यांना वेगळं कर आणि त्यांचं शुद्धीकरण कर.+ ७  तू त्यांना अशा प्रकारे शुद्ध कर: पापापासून शुद्ध करणारं पाणी त्यांच्यावर शिंपड. मग त्यांनी वस्तऱ्‍याने आपल्या शरीरावरचे सगळे केस काढावेत, आपले कपडे धुवावेत आणि अशा रितीने स्वतःला शुद्ध करावं.+ ८  त्यानंतर त्यांनी एक गोऱ्‍हा*+ आणि त्यासोबतचं अन्‍नार्पण,+ म्हणजे तेलात मिसळलेलं चांगलं पीठ घ्यावं. तूही पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्‍हा घे.+ ९  मग तू लेव्यांना भेटमंडपासमोर आण आणि सर्व इस्राएली लोकांना जमा कर.+ १०  तू लेव्यांना यहोवासमोर आणशील, तेव्हा इस्राएली लोकांनी लेव्यांवर आपले हात ठेवावेत.+ ११  मग अहरोनने लेव्यांना इस्राएली लोकांकडून ओवाळण्याचं अर्पण+ म्हणून, यहोवासमोर अर्पण करावं,* म्हणजे ते यहोवाची सेवा करतील.+ १२  त्यानंतर लेव्यांनी बैलांच्या डोक्यावर हात ठेवावेत.+ मग, त्यांपैकी एक पापार्पण म्हणून, तर दुसरा होमार्पण म्हणून लेव्यांच्या प्रायश्‍चित्तासाठी+ यहोवाला अर्पण केला जावा. १३  यानंतर तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या मुलांसमोर उभं कर आणि त्यांना यहोवासाठी ओवाळण्याचं अर्पण म्हणून अर्पण कर.* १४  तू लेव्यांना इस्राएली लोकांमधून वेगळं कर, म्हणजे लेवी माझे होतील.+ १५  यानंतर, लेवी भेटमंडपात सेवा करू लागतील. अशा रितीने तू त्यांना शुद्ध करावं आणि त्यांना ओवाळण्याचं अर्पण म्हणून अर्पण करावं.* १६  कारण ते देण्यात आलेले लोक आहेत. त्यांना इस्राएली लोकांमधून मला देण्यात आलं आहे. इस्राएली लोकांच्या सगळ्या प्रथमपुत्रांऐवजी*+ मी त्यांना माझ्यासाठी निवडून घेत आहे. १७  इस्राएलमधला प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे, मग तो माणूस असो किंवा प्राणी.+ ज्या दिवशी मी इजिप्त देशातल्या प्रत्येक पहिल्या जन्मलेल्याला ठार मारलं,+ त्याच दिवशी मी त्यांना माझ्यासाठी वेगळं केलं. १८  इस्राएलमधल्या सर्व प्रथम जन्मलेल्यांऐवजी मी लेव्यांना स्वतःसाठी घेईन. १९  मी इस्राएली लोकांमधून लेव्यांना, देण्यात आलेले लोक म्हणून अहरोन आणि त्याच्या मुलांना देईन. ते इस्राएली लोकांच्या वतीने भेटमंडपात सेवा करतील+ आणि त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करतील; म्हणजे इस्राएली लोक पवित्र ठिकाणाच्या जवळ येण्याचं पाप करणार नाहीत आणि त्यांना शिक्षा होणार नाही.”+ २०  मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली लोकांनी लेव्यांसोबत तसंच केलं. यहोवाने मोशेला लेव्यांबद्दल दिलेल्या सर्व आज्ञांप्रमाणेच इस्राएली लोकांनी त्यांच्या बाबतीत केलं. २१  मग लेव्यांनी स्वतःला शुद्ध केलं आणि आपले कपडे धुतले.+ त्यानंतर, अहरोनने त्यांना ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवासमोर अर्पण केलं.*+ मग त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी अहरोनने त्यांच्याकरता प्रायश्‍चित्त केलं.+ २२  यानंतर लेवी भेटमंडपात आपली सेवा करण्यासाठी अहरोन आणि त्याच्या मुलांसमोर गेले. यहोवाने लेव्यांबद्दल मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच लोकांनी लेव्यांसोबत केलं. २३  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २४  “लेव्यांसाठी हा नियम आहे: २५ वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषाने भेटमंडपात सेवा करणाऱ्‍यांच्या गटात सामील व्हावं. २५  पण, ५० वर्षांचा झाल्यावर त्याने सेवेच्या गटातून निवृत्त व्हावं, आणि त्यापुढे सेवा करू नये. २६  तो भेटमंडपात आपापल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करणाऱ्‍या त्याच्या भावांना मदत करू शकतो, पण त्याने भेटमंडपात सेवा करू नये. लेव्यांच्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्‍यांच्या बाबतीत तू असं करावं.”+

तळटीपा

किंवा “तरणा बैल.”
शब्दशः “ओवाळावं,” म्हणजे मागेपुढे हालायला लावावं.
शब्दशः “ओवाळावं,” म्हणजे मागेपुढे हालायला लावावं.
शब्दशः “ओवाळावं,” म्हणजे मागेपुढे हालायला लावावं.
किंवा “गर्भाशय उघडणाऱ्‍या सर्व पहिल्या जन्मलेल्यांऐवजी.”
शब्दशः “ओवाळलं,” म्हणजे मागेपुढे हालायला लावलं.