नहेम्या ५:१-१९
५ मग, लोकांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहुदी भावांविरुद्ध खूपच तक्रार करायला सुरुवात केली.+
२ काही लोक म्हणू लागले: “आम्ही पुष्कळ लोक आहोत आणि आम्हाला बरीच मुलंबाळं आहेत. जिवंत राहण्यासाठी आम्हाला पोट भरेल इतकं अन्न मिळालं पाहिजे.”
३ तर इतर लोक असं म्हणत होते: “या दुष्काळात अन्न मिळवण्यासाठी आम्हाला आमची शेतं, द्राक्षमळे आणि घरं गहाण ठेवावी लागतात.”
४ आणखी काही लोक म्हणत होते: “राजाचा कर भरण्यासाठी आम्ही आमच्या शेतांवर आणि द्राक्षमळ्यांवर पैसे उसने घेतले आहेत.+
५ खरंतर, आम्ही आणि आमचे भाऊ एकाच हाडामांसाचे आहोत* आणि आमची मुलं त्यांच्या मुलांपेक्षा काही वेगळी नाहीत. तरीही, आम्हाला आमच्या मुलामुलींना गुलाम म्हणून विकावं लागतंय. आमच्या काही मुली तर आधीच गुलामगिरीत आहेत.+ पण हे थांबवण्याची ताकद आमच्यात नाही, कारण आमची शेतं आणि द्राक्षमळे इतरांच्या ताब्यात आहेत.”
६ त्यांच्या या तक्रारी ऐकून मला खूप राग आला.
७ म्हणून मी या गोष्टींवर विचार केला आणि मग या विषयावर मी उपअधिकाऱ्यांसोबत आणि उच्च घराण्यांतल्या लोकांसोबत बोललो आणि त्यांना म्हणालो: “तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्याच भावाकडून व्याज घेतोय.”+
शिवाय, हा प्रश्न सोडवण्यासाठी मी एक मोठी सभाही भरवली.
८ मी त्यांना म्हणालो: “आपल्या ज्या यहुदी भावांना, इतर राष्ट्रांना विकण्यात आलं होतं, त्यांना परत विकत घेण्यासाठी आम्हाला शक्य होतं ते सर्व आम्ही केलं. मग, आता तुम्ही आपल्याच भावांना विकणार आहात का,+ आणि आम्हाला त्यांना परत विकत घ्यावं लागेल का?” हे ऐकून ते काहीच उत्तर देऊ शकले नाहीत, कारण काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं.
९ मग मी त्यांना म्हणालो: “तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. इतर राष्ट्रांनी, म्हणजे आपल्या शत्रूंनी आपली निंदा करू नये, म्हणून तुम्ही आपल्या देवाला भिऊन वागायला नको का?+
१० तेव्हा आता कृपा करून व्याज घेणं बंद करा. मी, माझे भाऊ आणि माझे सेवक तर आपल्या यहुदी भावांकडून व्याज न घेता त्यांना धान्य आणि पैसे उसने देतो.+
११ तुम्ही आजच्या आज त्यांची शेतं, द्राक्षमळे आणि जैतुनाच्या बागा त्यांना परत करा.+ तसंच, त्यांचे पैसे, नवीन द्राक्षारस आणि तेल यांतला जो शंभरावा भाग* तुम्ही त्यांच्याकडून व्याज म्हणून घेता, तोही त्यांना परत करा.”
१२ यावर ते म्हणाले: “या सर्व गोष्टी आम्ही त्यांना परत करू आणि त्यांच्याकडून काहीच मागणार नाही. तू जसं सांगितलंस तसंच आम्ही करू.” त्यांनी त्यांचं हे वचन पाळण्याची शपथ घ्यावी म्हणून मी याजकांना बोलावलं.
१३ त्यासोबतच मी आपलं वस्त्र झटकलं आणि म्हणालो: “जो कोणी हे वचन पाळणार नाही, त्या प्रत्येकाला खऱ्या देवाने त्याच्या घरादारातून आणि मालमत्तेतून अशाच रितीने झटकून टाकावं. त्या माणसाला अशा प्रकारे झटकून कंगाल करून टाकलं जावं.” यावर मंडळीतले सर्व जण “आमेन!”* असं म्हणाले. मग त्यांनी यहोवाची स्तुती केली आणि लोकांनी वचन दिल्याप्रमाणे केलं.
१४ इतकंच नाही, तर राजाने मला ज्या दिवसापासून यहूदा प्रांताचा राज्यपाल+ बनवलं, त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे अर्तहशश्त राजाच्या शासनकाळाच्या+ २० व्या वर्षापासून+ ते ३२ व्या वर्षापर्यंत,+ एकूण १२ वर्षं, मी किंवा माझ्या भावांनी राज्यपालाला दिला जाणारा अन्नाचा भत्ता घेतला नाही.+
१५ पण माझ्याआधीच्या राज्यपालांनी लोकांवर खूप भार टाकला होता आणि ते त्यांच्याकडून दररोज अन्नासाठी आणि मद्यासाठी चांदीचे ४० शेकेल* घेत होते. त्यांचे सेवकही लोकांवर खूप अत्याचार करायचे. पण मला देवाची भीती असल्यामुळे+ मी तसं केलं नाही.+
१६ शिवाय, भिंत बांधण्याच्या कामात मी स्वतः हातभार लावला आणि माझे सर्व सेवकही तिथे काम करायचे. आम्ही कोणाकडून साधं एक शेतही घेतलं नाही.+
१७ माझ्या मेजावर १५० यहुदी आणि उपअधिकारी, तसंच इतर राष्ट्रांतून येणारे पाहुणेही जेवायला असायचे.
१८ दररोज, माझ्या आज्ञेने* एक बैल, सहा धष्टपुष्ट मेंढे आणि वेगवेगळे पक्षी यांचं मांस शिजवलं जायचं आणि दर दहा दिवसांनी सर्व प्रकारची मद्यं भरपूर प्रमाणात मेजावर आणली जायची. इतकं सर्व असूनही मी राज्यपालाला दिला जाणारा भत्ता कधी मागितला नाही, कारण लोकांवर आधीच राजाच्या सेवेचा भार होता.
१९ म्हणून मी अशी प्रार्थना केली, “हे माझ्या देवा, मी या लोकांसाठी जे काही केलं आहे ते विसरू नकोस.+ माझी आठवण ठेव आणि मला आशीर्वाद दे.”
तळटीपा
^ शब्दशः “आमच्या भावांच्या मांसासारखंच आमचं मांस आहे.”
^ किंवा “एक टक्का,” म्हणजे, दर महिन्याला एक टक्का.
^ किंवा “असंच घडो.”
^ किंवा “माझ्या खर्चाने.”