नीतिवचनं २७:१-२७
२७ उद्याच्या दिवसाबद्दल बढाई मारू नकोस,कारण उद्याचा दिवस कसा असेल* हे तुला माहीत नाही.+
२ तुझ्या स्वतःच्या तोंडाने नाही, तर दुसऱ्याने* तुझी प्रशंसा करावी;तुझ्या ओठांनी नाही, तर इतरांच्या* ओठांनी तुझी स्तुती करावी.+
३ दगड आणि वाळू दोन्ही वजनदार असतात,पण मूर्खामुळे होणारा मनस्ताप त्यांच्यापेक्षाही जड असतो.+
४ क्रोधाची क्रूरता आणि संतापाचा महापूर परवडला,पण ईर्ष्येपुढे* कोण टिकू शकतं?+
५ मनात लपवलेल्या प्रेमापेक्षा उघडपणे दिलेलं ताडन बरं!+
६ मित्राने केलेले घाव विश्वासू असतात,+पण शत्रू चुंबनांचा वर्षाव करतो.*
७ ज्याचं पोट भरलेलं असतं, तो पोळ्यातल्या मधालाही नको म्हणतो,*पण जो भुकेला असतो, त्याला कडू पदार्थही गोड लागतो.
८ स्वतःचं घर सोडून भटकणारा माणूस,आपल्या घरट्यातून उडून जाणाऱ्या पक्ष्यासारखा असतो.
९ तेल आणि धूप यांमुळे जसा मनाला आनंद होतो,तसाच प्रामाणिक* सल्ल्याने जुळलेल्या मैत्रीच्या गोड नात्यानेही होतो.+
१० तुझ्या मित्राला किंवा तुझ्या वडिलांच्या मित्राला सोडून देऊ नकोसआणि संकटाच्या दिवशी आपल्या भावाच्या घरी पाऊल ठेवू नकोस;दूर राहणाऱ्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा!+
११ माझ्या मुला, सुज्ञपणे* वाग म्हणजे मला मनापासून आनंद होईल+आणि मला टोमणे मारणाऱ्याला मी उत्तर देऊ शकेन.+
१२ शहाणा माणूस धोका पाहून लपतो,+पण भोळा पुढे जातो आणि परिणाम* भोगतो.
१३ जर कोणी अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याचं वस्त्र घे;त्याने वाईट चालीच्या स्त्रीचं* कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याच्याकडून तारण जप्त कर.+
१४ कोणी पहाटे उठून मोठ्या आवाजाने आपल्या मित्राला आशीर्वाद दिला,तर तो आशीर्वादही शाप समजला जाईल.
१५ भांडखोर* बायको पावसाच्या दिवसांत सतत गळणाऱ्या छतासारखी असते.+
१६ जो तिला आवरू शकतो तो वाऱ्याला आवरू शकेलआणि आपल्या उजव्या हाताने तेल पकडू शकेल.
१७ लोखंड जसं लोखंडाला धार लावतं,तसाच एक माणूस आपल्या मित्राला सुधारतो.*+
१८ जो अंजिराच्या झाडाची काळजी घेतो, तो त्याचं फळ खाईल+आणि जो आपल्या मालकाची काळजी घेतो, त्याचा सन्मान केला जाईल.+
१९ पाण्यात चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसतं,तसं एका माणसाच्या मनात दुसऱ्याच्या मनाचं प्रतिबिंब दिसतं.
२० कबर आणि नाशाचं ठिकाण कधीही तृप्त होत नाही,+त्याच प्रकारे माणसाचे डोळेही कधीच तृप्त होत नाहीत.
२१ सोनंचांदी शुद्ध करण्यासाठी जसं आगीत टाकतात,+तशीच माणसाची परीक्षा त्याला मिळणाऱ्या प्रशंसेमुळे होते.
२२ अक्कलशून्य माणसाला धान्यासारखंउखळात घालून मुसळाने कुटलं,तरी त्याचा मूर्खपणा जात नाही.
२३ तुला आपल्या कळपाची पूर्ण माहिती असली पाहिजे.
आपल्या मेंढरांची चांगली काळजी घे.*+
२४ कारण संपत्ती कायम टिकत नाही+आणि मुकुटही पिढ्या न् पिढ्या राहत नाही.
२५ हिरवं गवत सुकून, पुन्हा कोवळं गवत उगवतंआणि डोंगरांवरून हिरवळ कापून गोळा केली जाते.
२६ कोकऱ्यांमुळे तुला वस्त्रं मिळतातआणि बकरे विकून तुला शेत घेता येईल.
२७ तुझ्याकडे बकऱ्यांचं इतकं दूध असेल,की तू आणि तुझ्या कुटुंबातले सर्व जण तृप्त होतील,तसंच, तुझ्या दासींचंही पोषण होईल.
तळटीपा
^ शब्दशः “काय जन्माला आणेल.”
^ शब्दशः “अनोळखी माणसाने.”
^ शब्दशः “विदेश्याच्या.”
^ किंवा “हेव्यापुढे.”
^ किंवा कदाचित, “मनात कपट ठेवून; फक्त दाखवण्यासाठी.”
^ शब्दशः “पायाखाली तुडवतो.”
^ किंवा “मनापासून दिलेल्या.”
^ किंवा “बुद्धिमानपणे.”
^ किंवा “दंड.”
^ किंवा “विदेशी माणसाचं.”
^ किंवा “कटकटी.”
^ किंवा “धारदार करतो.” शब्दशः “मित्राच्या चेहऱ्याला.”
^ किंवा “मन लाव; लक्ष दे.”