यहेज्केल २५:१-१७

  • अम्मोनविरुद्ध भविष्यवाणी (१-७)

  • मवाबविरुद्ध भविष्यवाणी (८-११)

  • अदोमविरुद्ध भविष्यवाणी (१२-१४)

  • पलिष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी (१५-१७)

२५  मग पुन्हा एकदा यहोवाकडून मला संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २  “मनुष्याच्या मुला! अम्मोनी लोकांकडे+ आपलं तोंड कर आणि त्यांच्याविरुद्ध भविष्यवाणी कर.+ ३  त्यांना म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा काय म्हणतो ते ऐका. सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “माझं मंदिर जेव्हा अपवित्र करण्यात आलं, इस्राएल देश जेव्हा ओसाड करण्यात आला आणि यहूदाचं घराणं जेव्हा बंदिवासात गेलं, तेव्हा तुम्ही म्हणाला: ‘बरं झालं!’ ४  म्हणून आता मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते येऊन तुमच्यामध्ये छावणी करतील* आणि तुमच्यामध्ये आपले तंबू ठोकतील. ते तुमच्या देशातलं उत्पन्‍न खातील आणि तुमच्या प्राण्यांचं दूध पितील. ५  मी राब्बा+ शहराला उंटांचं चरण्याचं ठिकाण बनवीन आणि अम्मोनी लोकांच्या देशाला गुराढोरांचं विसाव्याचं स्थान करून टाकीन. तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.”’” ६  “सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘इस्राएल देशाची दशा पाहून तुम्ही त्याची थट्टा केली आणि खूश झालात. तुम्ही टाळ्या वाजवल्या+ आणि आनंदाने उड्या मारल्या.+ ७  म्हणून आता मी तुमच्यावर आपला हात उगारीन आणि राष्ट्रांनी तुम्हाला लुटावं, म्हणून मी तुम्हाला त्यांच्या हाती देईन. मी सगळ्या राष्ट्रांमधून आणि देशांमधून तुमचं नामोनिशाण मिटवून टाकीन.+ मी तुमचा समूळ नाश करीन, तेव्हा तुम्हाला कळून येईल की मी यहोवा आहे.’ ८  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मवाब+ आणि सेईर+ असं म्हणाले: “बघा! यहूदाचं घराणं तर इतर राष्ट्रांसारखंच आहे.” ९  म्हणून पाहा! मी शत्रूला मवाबच्या उतारांवर हल्ला करायला लावीन. त्याच्या सीमेजवळ असलेल्या आणि त्या देशाची शान असलेल्या शहरांवर, म्हणजे बेथ-यशिमोथ, बाल-मोन आणि किर्याथाईम+ यांच्यावर मी शत्रूला हल्ला करायला लावीन. १०  मी मवाबी आणि अम्मोनी लोकांना पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन.+ आणि कोणत्याही राष्ट्राला अम्मोनी लोकांची आठवण राहणार नाही.+ ११  मी मवाबी लोकांवर न्यायदंड बजावीन,+ तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.’ १२  सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘अदोम हा यहूदाच्या घराण्याशी सूड घेण्याच्या हेतूने वागलाय आणि त्यांचा बदला घेऊन त्याने स्वतःवर मोठा दोष ओढवून घेतलाय.+ १३  म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “मीसुद्धा अदोमवर आपला हात उगारीन आणि त्याच्यामधून माणसांचा आणि गुराढोरांचा नाश करीन. मी त्याला ओसाड करून टाकीन.+ तेमानपासून थेट ददानपर्यंत सगळे लोक तलवारीने मारले जातील.+ १४  ‘मी माझ्या इस्राएली लोकांच्या हातून अदोमवर सूड उगवीन.+ त्यांच्याद्वारे मी अदोमवर माझ्या रागाचा आणि क्रोधाचा वर्षाव करीन. मग त्यांना कळून येईल की मी कसा सूड उगवतो,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”’ १५  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘पलिष्ट्यांनी कायम इस्राएली लोकांबद्दल मनात शत्रुत्व बाळगलं. त्यांनी नेहमीच द्वेषभावनेने त्यांचा बदला घ्यायचा आणि नाश करायचा प्रयत्न केला.+ १६  म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “पाहा! मी पलिष्ट्यांवर आपला हात उगारीन.+ मी करेथी+ लोकांचा आणि समुद्रकिनाऱ्‍यावरच्या उरलेल्या रहिवाशांचा नाश करून टाकीन.+ १७  मी त्यांना कडक शिक्षा करून त्यांच्यावर माझा भयंकर सूड उगवीन. आणि मी जेव्हा सूड उगवीन तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.”’”

तळटीपा

किंवा “भिंती असलेल्या छावण्या घालतील.”