यहेज्केल ३१:१-१८
-
उंच देवदार वृक्ष, इजिप्त खाली पडतो (१-१८)
३१ मग ११ व्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मला यहोवाकडून परत एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला:
२ “मनुष्याच्या मुला, इजिप्तचा राजा फारो आणि त्याच्या जमावाला असं सांग,+
‘तुझ्यासारखा महान कोण आहे?
३ तू एका अश्शूरी माणसासारखा आहेस;तू सुंदर फांद्या असलेल्या आणि दाट सावली देणाऱ्या लबानोनमधल्या देवदार वृक्षासारखा आहेस.
तो वृक्ष अतिशय उंच वाढला आणि त्याचा शेंडा ढगांना जाऊन भिडला.
४ भरपूर पाण्यामुळे तो खूप वाढला; जमिनीखाली असलेल्या झऱ्यांमुळे तो अतिशय उंच झाला.
तो वृक्ष जिथे लावला होता तिथे चारही बाजूंनी पाण्याचे झरे वाहायचे,त्यांतून निघणारे पाण्याचे पाट देशातल्या सगळ्या झाडांचं सिंचन करायचे.
५ म्हणून देशातल्या इतर झाडांपेक्षा तो वृक्ष सगळ्यात उंच वाढला.
झऱ्यांपासून मिळणाऱ्या भरपूर पाण्यामुळे,त्याला पुष्कळ फांद्या फुटल्या आणि त्या लांबलचक झाल्या.
६ आकाशातल्या सगळ्या पक्ष्यांनी येऊन त्याच्या फांद्यांवर घरटी बनवली.
रानातल्या सगळ्या प्राण्यांनी त्याच्या शाखांखाली आपल्या पिल्लांना जन्म दिला,आणि मोठमोठ्या राष्ट्रांनी त्याच्या सावलीत वस्ती केली.
७ त्या वृक्षाची मुळं खाली जलाशयांपर्यंत पोहोचली होती,म्हणून त्याचं सौंदर्य अप्रतिम झालं, आणि त्याच्या फांद्या लांबलचक होऊन तो वैभवशाली झाला.
८ देवाच्या बागेतला+ कोणताही देवदार वृक्ष त्याच्या तोडीचा नव्हता.
गंधसरूच्या एकाही झाडाला त्याच्यासारख्या फांद्या नव्हत्या,आणि कुठल्याही अर्मोन वृक्षाला त्याच्यासारख्या शाखा नव्हत्या.
देवाच्या बागेतलं कोणतंही झाड सौंदर्याच्या बाबतीत त्याच्याशी बरोबरी करू शकत नव्हतं.
९ मी त्याला भरपूर हिरवीगार पानं देऊन सुंदर बनवलं.
खऱ्या देवाच्या बागेतल्या, एदेन बागेतल्या सगळ्या झाडांना त्याचा हेवा वाटायचा.’
१० सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तो वृक्ष इतका उंच झाला की त्याचा शेंडा ढगांना जाऊन भिडला, आणि अतिशय उंच झाल्यामुळे तो मगरूर झाला.
११ म्हणून मी त्याला शक्तिशाली शासकाच्या, राष्ट्रांवर अधिकार गाजवणाऱ्या शासकाच्या हाती देईन.+ तो त्याचा चांगलाच समाचार घेईल आणि त्याच्या दुष्टपणामुळे मी त्याचा त्याग करीन.
१२ राष्ट्रांतले सगळ्यात क्रूर लोक, विदेशी लोक त्याला कापून टाकतील. ते त्याला डोंगरांवर सोडून देतील. त्याची पानं सगळ्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये पडतील आणि त्याच्या तुटलेल्या फांद्या देशातल्या झऱ्यांमध्ये पडून राहतील.+ त्याच्या सावलीत वस्ती करणारी पृथ्वीवरची सर्व राष्ट्रं त्याच्यापासून निघून जातील आणि त्याला सोडून देतील.
१३ आकाशातले सगळे पक्षी त्याच्या पडलेल्या खोडावर राहतील, आणि रानातले सगळे प्राणी त्याच्या फांद्यांवर वस्ती करतील.+
१४ हे सगळं यासाठी होईल, कारण पाण्याजवळ लावलेल्या कोणत्याही झाडाने त्याच्याइतकी उंची गाठू नये, आपला शेंडा ढगांपर्यंत नेऊ नये आणि भरपूर पाणी मिळालेल्या कोणत्याही झाडाने त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. कारण त्या सगळ्यांना मृत्यूच्या हवाली केलं जाईल. कबरेत जाणाऱ्या माणसांसोबत ते सगळे जमिनीखाली जातील.’
१५ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘ज्या दिवशी तो वृक्ष खाली कबरेत* जाईल, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावीन. पाण्याचे पाट वाहू नयेत, म्हणून मी खोल जलाशय झाकून टाकीन आणि त्यांचे झरे रोखून धरीन. त्या वृक्षामुळे मी लबानोनला अंधारात बुडवून टाकीन आणि देशातली सगळी झाडं वाळून जातील.
१६ मी त्याला आणि त्याच्यासोबत खाली खड्ड्यात जाणाऱ्यांना कबरेत* पाडून टाकीन, तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने राष्ट्रं थरथर कापतील. आणि कबरेत असलेल्या एदेनच्या सगळ्या झाडांचं,+ लबानोनच्या उत्तम व डौलदार झाडांचं आणि भरपूर पाणी मिळालेल्या सर्व झाडांचं समाधान होईल.
१७ तेही त्याच्यासारखंच खाली कबरेत* गेले होते; तलवारीने ज्यांची कत्तल झाली, त्यांच्याकडे ते गेले होते.+ त्यांच्यासोबतच, राष्ट्रांमध्ये जे त्याच्या सावलीत राहायचे आणि त्याला मदत करायचे, तेही खाली कबरेत गेले.’+
१८ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘एदेनच्या झाडांपैकी असं एकतरी झाड होतं का ज्याचं वैभव आणि महानता तुझ्यासारखी होती?+ पण तरीसुद्धा एदेनच्या झाडांसोबत तुलापण जमिनीखाली टाकलं जाईल. तिथे तू तलवारीने मारलेल्यांसोबत, सुंता* न झालेल्यांसोबत पडून राहशील. फारोची आणि त्याच्या जमावाची अगदी अशीच अवस्था होईल.’”
तळटीपा
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.