याकोब याचं पत्र २:१-२६
२ माझ्या बांधवांनो, आपल्या गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासोबतच तुम्ही भेदभाव तर करत नाही ना?+
२ समजा तुमच्या सभेला सोन्याच्या अंगठ्या आणि महागाचे कपडे घातलेला एखादा माणूस आला आणि त्याच वेळी मळकट कपडे घातलेला कोणी गरीब माणूसही आला,
३ तर महागाचे कपडे घातलेल्या माणसाकडे आदराने पाहून, “तुम्ही या चांगल्या जागेवर बसा,” असं तुम्ही म्हणता का? आणि गरिबाला मात्र, “तू उभाच राहा,” किंवा “तू जमिनीवर बस,” असं म्हणता का?+
४ असं तुम्ही करत असाल, तर तुमच्यामध्ये उच्चनीच असा भेदभाव नाही का?+ आणि तुम्ही दुष्टपणे न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश ठरणार नाही का?+
५ माझ्या प्रिय बांधवांनो, माझं ऐका. देवाने जगाच्या दृष्टीने गरीब असलेल्यांना विश्वासात श्रीमंत होण्यासाठी+ आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना ज्या राज्याचं वचन दिलं आहे, त्याचे वारस बनण्यासाठी निवडलं नाही का?+
६ पण, तुम्ही गरिबांचा अनादर केला आहे. खरंतर, श्रीमंत लोकच तुमच्यावर जुलूम करत नाहीत का,+ आणि तुम्हाला न्यायालयांत ओढत नाहीत का?
७ तुम्हाला देण्यात आलेल्या चांगल्या नावाची हेच लोक निंदा करत नाहीत का?
८ “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर,”+ ही शास्त्रवचनांत दिलेली राजाज्ञा* तुम्ही पाळत असाल तर फार चांगली गोष्ट आहे.
९ पण, जर तुम्ही भेदभाव करत राहिलात+ तर तुम्ही पाप करत आहात, आणि या नियमाप्रमाणे अपराधी आहात.+
१० जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचं पालन करतो, पण त्यातली एखादी आज्ञा मोडतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राचं उल्लंघन करणारा ठरतो.+
११ कारण, “व्यभिचार करू नका,”+ असं ज्याने म्हटलं त्यानेच “खून करू नका,”+ असंही म्हटलं. आता, जर तुम्ही व्यभिचार केला नाही, पण खून केला, तर तुम्ही नियमशास्त्राचं उल्लंघन करणारे ठरला आहात.
१२ स्वतंत्र लोकांच्या नियमाप्रमाणे* ज्यांचा न्याय केला जाणार आहे, अशांसारखंच नेहमी बोला आणि वागा.+
१३ कारण जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.+ न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!*
१४ माझ्या बांधवांनो, ‘मी विश्वास ठेवतो,’ असं जर एखादा म्हणत असेल, पण त्याप्रमाणे वागत नसेल, तर त्याचा काय उपयोग?+ असा विश्वास खरंच त्याला वाचवू शकेल का?+
१५ एखाद्या भावाकडे किंवा बहिणीकडे कपडे नाहीत* आणि दिवसापुरतं अन्न नाही,
१६ आणि तरी तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो: “शांतीने जा, सुखात राहा.”* पण ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या तुम्ही देत नाही तर त्याचा काय उपयोग?+
१७ त्याचप्रमाणे, कार्यांशिवाय नुसताच विश्वास निर्जीव आहे.+
१८ असं असूनही, एखादा म्हणेल: “तुझ्याजवळ विश्वास आहे, पण मी कार्यं करतो. कार्यांशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कार्यांवरून माझा विश्वास तुला दाखवीन.”
१९ एकच देव आहे असं तू मानतोस ना? फार चांगली गोष्ट आहे. पण खरं पाहिलं, तर दुष्ट स्वर्गदूतसुद्धा* असं मानतात आणि थरथर कापतात.+
२० अरे मूर्ख माणसा, कार्यांशिवाय विश्वास व्यर्थ आहे हे समजायला तुला पुरावा हवा आहे का?
२१ आपला पिता अब्राहाम याने त्याच्या मुलाला, इसहाकला अर्पण करण्यासाठी वेदीवर ठेवलं तेव्हा त्याला कार्यांद्वारेच नीतिमान ठरवण्यात आलं नाही का?+
२२ तर यावरून दिसतं, की त्याच्या विश्वासाला कार्यांची जोड होती आणि त्याच्या कार्यांमुळेच त्याचा विश्वास परिपूर्ण झाला.+
२३ अशा रितीने “अब्राहामने यहोवावर* विश्वास ठेवला आणि यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं,”+ हे शास्त्रवचन पूर्ण झालं आणि त्याला यहोवाचा* मित्र म्हणण्यात आलं.+
२४ तर मग स्पष्टच आहे, की माणूस फक्त विश्वासाने नाही, तर कार्यांद्वारे नीतिमान ठरतो.
२५ त्याचप्रमाणे, राहाब वेश्येने गुप्तहेरांचा पाहुणचार करून त्यांना वेगळ्या वाटेने पाठवून दिल्यामुळे,+ तिलासुद्धा कार्यांद्वारेच नीतिमान ठरवण्यात आलं नव्हतं का?
२६ म्हणून, शरीर ज्याप्रमाणे श्वासाशिवाय* निर्जीव आहे,+ त्याप्रमाणे विश्वाससुद्धा कार्यांशिवाय निर्जीव आहे.+
तळटीपा
^ किंवा “राजाने दिलेली महान आज्ञा.”
^ शब्दशः “स्वतंत्रतेच्या नियमाप्रमाणे.”
^ शब्दशः “दया न्यायावर विजय मिळवते.”
^ शब्दशः “उघडी आहे.”
^ शब्दशः “शांतीने जा, उबदार कपडे घाला आणि पोटभर जेवा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूची पाहा.