यिर्मया ११:१-२३

  • यहूदा यहोवासोबतचा करार मोडतो (१-१७)

    • दैवतांची संख्या शहरांइतकी जास्त (१३)

  • यिर्मया कत्तल करायला नेल्या जाणाऱ्‍या कोकऱ्‍यासारखा (१८-२०)

  • यिर्मयाच्या शहरातल्या लोकांकडूनच त्याचा विरोध (२१-२३)

११  यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  “या करारातले शब्द सर्व लोकांनी ऐकावेत! तू* यहूदाच्या माणसांशी आणि यरुशलेमच्या लोकांशी बोल, ३  आणि त्यांना सांग, ‘इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: “जो कोणी या करारात लिहिलेल्या गोष्टी पाळत नाही, तो शापित आहे.+ ४  ज्या दिवशी मी तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून, लोखंड वितळवणाऱ्‍या भट्टीतून बाहेर आणलं,+ त्या दिवशी मी त्यांना या करारातल्या गोष्टी पाळायला सांगितल्या होत्या.+ मी त्यांना म्हणालो होतो: ‘माझं ऐका आणि माझ्या सगळ्या आज्ञा पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन.+ ५  मी तुमच्या वाडवडिलांना दूध आणि मध वाहत असलेला देश देण्याचं जे वचन दिलं होतं, ते मी पूर्ण करीन.+ आणि ते पूर्ण होत असल्याचं तुम्ही पाहत आहात.’”’” तेव्हा मी म्हणालो: “हे यहोवा, असंच घडो.”* ६  मग यहोवा मला म्हणाला: “यहूदाच्या सगळ्या शहरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर अशी घोषणा कर: ‘या करारात काय सांगितलंय ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. ७  कारण मी तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून बाहेर आणलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्यांना वारंवार असं बजावून सांगत आलोय, की “माझ्या आज्ञा पाळा.”+ ८  पण त्यांनी माझं ऐकलं नाही, किंवा माझ्या सांगण्याकडे कान दिले नाहीत. उलट, प्रत्येक जण हट्टी बनला आणि आपल्या दुष्ट मनाला येईल तसं वागत राहिला.+ मी जो करार त्यांना पाळायला सांगितला होता तो त्यांनी पाळला नाही, म्हणून त्या करारात सांगितल्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा केली.’” ९  मग यहोवा मला म्हणाला: “यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांनी माझ्याविरुद्ध कट रचलाय. १०  त्यांच्या वाडवडिलांनी पूर्वी जे अपराध केले होते, तेच अपराध ते करत आहेत; ज्यांनी माझं ऐकायला नकार दिला त्या त्यांच्या वाडवडिलांच्या अपराधांकडे ते वळालेत.+ ते इतर देवांच्या नादी लागले आहेत आणि त्यांची सेवा करत आहेत.+ इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्याने मी त्यांच्या वाडवडिलांसोबत केलेला करार मोडलाय.+ ११  म्हणून यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी त्यांच्यावर संकट आणतोय.+ त्यापासून ते पळू शकणार नाहीत. ते मला मदतीसाठी हाक मारतील, पण मी त्यांचं ऐकणार नाही.+ १२  तेव्हा यहूदाच्या शहरातले आणि यरुशलेममधले लोक ज्या देवांसाठी बलिदानं देतात त्यांच्याकडे ते वळतील आणि त्यांना मदत मागतील.+ पण त्यांच्या संकटाच्या काळात त्यांचे देव त्यांना मुळीच वाचवू शकणार नाहीत. १३  कारण, हे यहूदा! तुझ्या देवांची संख्या तुझ्या शहरांइतकी जास्त झाली आहे. आणि यरुशलेममध्ये जितके रस्ते आहेत, तितक्या वेदी तू घृणास्पद दैवतासाठी बनवल्या आहेत; बआल दैवताला बलिदानं देण्यासाठी तू त्या बनवल्या आहेत.’+ १४  तू* मात्र या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस. त्यांच्यासाठी माझ्याकडे धावा करू नकोस किंवा विनंती करू नकोस.+ कारण, जेव्हा त्यांच्यावर संकट येईल आणि ते मला हाक मारतील, तेव्हा मी त्यांचं ऐकणार नाही. १५  माझ्या प्रिय लोकांना माझ्या मंदिरात असण्याचा काय अधिकार आहे? त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांनी दुष्ट कामं केलीत. तुझ्यावर* येणारं संकट ते काय पवित्र मांसाने* टाळू शकतील? टाळू शकले तर त्या वेळी खुशाल जल्लोष कर! १६  यहोवाने तुला हिरवंगार जैतुनाचं झाड,चांगल्या फळांनी लगडलेलं एक सुंदर झाड असं नाव दिलं होतं. पण आता त्याने मोठी गर्जना करून तुला आग लावली आहे,आणि तुझ्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. १७  तुझी लागवड करणारा,+ सैन्यांचा देव यहोवा याने अशी घोषणा केली आहे, की तुझ्यावर संकट येईल. कारण इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यांनी दुष्ट कामं केली आहेत; त्यांनी बआलसाठी बलिदानं देऊन माझा क्रोध भडकवलाय.”+ १८  हे यहोवा, मला कळावं म्हणून तू मला हे सांगितलंस;ते काय करत आहेत, हे त्या वेळी तू मला दाखवलंस. १९  मी तर कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्‍या शांत कोकऱ्‍यासारखा होतो. ते माझ्याविरुद्ध कट रचत असल्याचं मला माहीत नव्हतं;+ ते म्हणत होते: “चला, आपण या झाडाचा फळांसकट नाश करू,आणि त्याचं नामोनिशाण मिटवून टाकू. म्हणजे यापुढे कोणालाही त्याची आठवण राहणार नाही.” २०  पण, सैन्यांचा देव यहोवा नीतीने न्याय करतो;तो मनातले खोल विचार* आणि हृदय पारखतो.+ हे देवा, मी तुझ्याकडे फिर्याद केली आहे,म्हणून तू त्यांचा सूड घे आणि मला तो पाहू दे. २१  अनाथोथची+ जी माणसं माझा जीव घ्यायला टपली आहेत आणि असं म्हणत आहेत, की “यहोवाच्या नावाने भविष्यवाणी करू नकोस,+ नाहीतर आम्ही तुला मारून टाकू,” त्यांच्याविरोधात यहोवा बोलला आहे. २२  सैन्यांचा देव यहोवा म्हणाला: “पाहा, मी त्यांच्याकडून हिशोब घेईन. त्यांची तरुण माणसं तलवारीने+ आणि त्यांची मुलं-मुली दुष्काळाने मारली जातील.+ २३  अनाथोथच्या+ लोकांपैकी कोणीच वाचणार नाही. कारण ज्या वर्षी मी त्यांच्याकडून हिशोब घेईन, त्या वर्षी मी त्यांच्यावर संकट आणीन.”

तळटीपा

हे यिर्मयाला उद्देशून म्हटलं आहे असं दिसतं.
किंवा “आमेन.”
म्हणजे, यिर्मया.
म्हणजे, यहूदा.
म्हणजे, मंदिरात दिली जाणारी बलिदानं.
किंवा “भावना.”