यिर्मया १३:१-२७
१३ यहोवाने मला असं सांगितलं: “जा आणि स्वतःसाठी मलमलीचा* एक पट्टा विकत घे आणि तो कंबरेला बांध. पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”
२ म्हणून, यहोवाने सांगितल्याप्रमाणे मी एक पट्टा विकत घेतला आणि तो कंबरेला बांधला.
३ मग दुसऱ्यांदा मला यहोवाचा असा संदेश मिळाला:
४ “तू जो पट्टा विकत घेतलाय आणि कंबरेला बांधलाय, तो घेऊन फरात नदीकडे जा. तिथे तो एका खडकाच्या कपारीत लपवून ठेव.”
५ तेव्हा यहोवाने मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी फरात नदीकडे गेलो आणि तो पट्टा तिथे लपवून ठेवला.
६ मग बऱ्याच दिवसांनंतर यहोवाने मला सांगितलं: “ऊठ आणि फरात नदीकडे जा, आणि मी तुला जो पट्टा तिथे लपवायला सांगितला होता तो परत घे.”
७ म्हणून मी फरात नदीकडे गेलो आणि जिथे तो पट्टा लपवला होता, तिथून तो खोदून बाहेर काढला. मी बघितलं तर तो पट्टा पूर्णपणे खराब झाला होता; तो वापरण्याच्या लायकीचा राहिला नव्हता.
८ त्यानंतर मला यहोवाकडून असा संदेश मिळाला:
९ “यहोवा असं म्हणतो, ‘अगदी याचप्रमाणे मी यहूदाचा गर्व आणि यरुशलेमचा अहंकार मोडून टाकीन.+
१० हे दुष्ट लोक माझ्या आज्ञा पाळत नाहीत,+ ते हट्टी आहेत आणि आपल्या मनाला येईल तसं वागतात.+ ते इतर देवांच्या नादी लागलेत. ते त्यांची सेवा करतात आणि त्यांच्या पाया पडतात. म्हणून या दुष्ट लोकांची अवस्था या पट्ट्यासारखीच होईल; ते कुठल्याच कामाचे राहणार नाहीत.’
११ यहोवा म्हणतो, ‘पट्टा जसा माणसाच्या कंबरेला बांधून ठेवतात, तसं मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या संपूर्ण घराण्याला माझ्याशी बांधून ठेवलं. ते माझे लोक व्हावेत,+ तसंच त्यांनी माझं नाव,+ माझी स्तुती आणि माझी शोभा बनावं म्हणून मी असं केलं. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही.’+
१२ तू त्यांना असाही संदेश दे, ‘इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “प्रत्येक मोठं मडकं द्राक्षारसाने भरलेलं असावं.”’ पण ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक मोठं मडकं द्राक्षारसाने भरलेलं असावं, हे आम्हाला आधीपासूनच माहीत नाही का?’
१३ तेव्हा तू त्यांना सांग, ‘यहोवा म्हणतो: “मी या देशातल्या सगळ्या लोकांना, दावीदच्या राजासनावर बसलेल्या राजांना, याजकांना, संदेष्ट्यांना आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांना नशा येईपर्यंत दारू पाजत राहीन.+
१४ मी त्यांना एकमेकांवर आदळीन; बापाला आणि मुलाला एकमेकांवर आदळीन.+ मी त्यांच्यावर कोणतीही दयामाया करणार नाही किंवा त्यांच्याबद्दल मला काही वाईटही वाटणार नाही. त्यांचा नाश करण्यापासून मला कुठलीही गोष्ट थांबवू शकणार नाही.” असं यहोवा म्हणतो.’ +
१५ ऐका आणि लक्ष द्या.
अहंकाराने वागू नका, कारण यहोवा हे बोलला आहे.
१६ तुमचा देव यहोवा याचा गौरव करा;त्याने अंधार पाडण्याच्या आत,आणि संध्याकाळी तुमचे पाय डोंगरांवर अडखळण्याच्या आत त्याचा गौरव करा.
तुम्ही उजेडाची आशा धराल,पण तो दाट काळोख पाडेल;तो प्रकाशाला दाट अंधकार बनवेल.+
१७ आणि जर तुम्ही ऐकलं नाही,तर तुमच्या गर्विष्ठपणामुळे मी एकांतात जाऊन रडेन.
यहोवाच्या कळपाला बंदी बनवून नेल्यामुळे,+मी आसवे गाळीन आणि माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतील.+
१८ राजाला आणि राजमातेला सांगा,+ की त्यांनी राजासनावरून उतरून खाली बसावं.
कारण त्यांच्या डोक्यावरचा सुंदर मुकुट पडणार आहे.
१९ दक्षिणेकडची शहरं बंद करण्यात आली आहेत;* ती उघडायला कोणीही नाही.
यहूदाच्या सगळ्या लोकांना बंदिवासात नेण्यात आलं आहे; यहूदा पूर्णपणे बंदिवासात गेला आहे.+
२० आपली नजर वर कर आणि उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे बघ.+
तुला दिलेला कळप आणि तुझी सुंदर मेंढरं कुठे आहेत?+
२१ तू सुरुवातीपासून ज्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध जोडलेस,त्यांच्याकडूनच तुला शिक्षा मिळाल्यावर तू काय म्हणशील?+
स्त्रीला प्रसूतीच्या वेदना होतात, तशाच भयंकर वेदना तुला होणार नाहीत का?+
२२ आणि तू तुझ्या मनात म्हणशील, ‘माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी का घडल्या?’+
तेव्हा लक्षात ठेव, की तुझ्या घोर अपराधांमुळेच हे घडलंय,आणि त्यामुळेच तुझा झगा काढून टाकण्यात आलाय,+आणि तुझ्या टाचांना भयंकर वेदना होत आहेत.
२३ कूशी* माणसं आपल्या त्वचेचा रंग, किंवा चित्ते आपल्या अंगावरचे ठिपके बदलू शकतात का?+
ते जर बदलू शकले, तरच वाईट कामं करण्यात पटाईत असलेले तुम्ही लोक चांगली कामं करू शकता.
२४ वाळवंटातला वारा जसं सुकलेलं गवत विखरून टाकतो, तसं मी तुम्हाला विखरून टाकीन.”+
२५ यहोवा म्हणतो: “हाच तुझा वाटा आणि मी तुला मापून दिलेला तुझा हिस्सा आहे.
कारण तू मला विसरून गेलीस+ आणि खोट्या गोष्टींवर भरवसा ठेवलास.+
२६ म्हणून मी तुझा झगा उचलून तुझ्या तोंडावर टाकीन,आणि तुझी लाज सगळ्यांना दिसून येईल;+
२७ तुझी व्यभिचाराची कामं,+घोड्यांसारखं तुझं वासनेने खिंकाळणं,वेश्येसारखं तुझं निर्लज्ज वागणं,सगळ्यांना दिसून येईल.
हे यरुशलेम, तुझा धिक्कार असो!
तू टेकड्यांवर आणि मैदानांत करत असलेली सगळी घृणास्पद कामं मी पाहिली आहेत.+
तू कधीपर्यंत अशीच अशुद्ध अवस्थेत राहशील?”+