यिर्मया १४:१-२२
१४ दुष्काळाविषयी यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+
२ यहूदा शोक करत आहे,+ आणि त्याचे दरवाजे खाली पडले आहेत.
ते उदास होऊन जमिनीवर पडले आहेत,आणि यरुशलेममधला रडण्याचा आवाज स्वर्गापर्यंत ऐकू येत आहे.
३ तिथले मालक आपल्या सेवकांना पाणी आणायला पाठवतात.
ते विहीरींवर* जातात, पण त्यांना पाणी मिळत नाही.
ते आपली भांडी रिकामीच परत आणतात.
ते लज्जित आणि दुःखी होतात,आणि आपलं डोकं झाकून घेतात.
४ देशात पाऊस पडलेला नाही,+म्हणून जमिनीला भेगा पडल्या आहेत.
शेतकरी निराश झाले आहेत आणि त्यांनी आपलं डोकं झाकून घेतलं आहे.
५ हरिणीसुद्धा नुकत्याच जन्मलेल्या आपल्या पाडसांना सोडून देत आहेत,कारण कुठेही गवत उरलेलं नाही.
६ रानगाढवं उजाड पडलेल्या टेकड्यांवर उभी आहेत.
ती कोल्ह्यांसारखी धापा टाकत आहेत;झाडपाला नसल्यामुळे त्यांची नजर अंधूक झाली आहे.+
७ हे यहोवा! आम्ही अनेकदा तुझ्याशी अविश्वासूपणे वागलो,+आणि तुझ्याविरुद्ध पाप केलं.
आमचे अपराध आमच्याविरुद्ध साक्ष देत असले,तरी तू आपल्या नावासाठी कार्य कर.+
८ हे देवा, तू इस्राएलची आशा आहेस. संकटाच्या काळात तूच इस्राएलचा तारणकर्ता आहेस.+
मग या देशासाठी तू एखाद्या परक्या माणसासारखा का झालास?
रात्र काढायला थांबलेल्या एखाद्या प्रवाशासारखा तू का वागतोस?
९ तू सुन्न झालेल्या माणसासारखा का झालास?
शक्ती असूनही वाचवू न शकणाऱ्या योद्ध्यासारखा तू का झालास?
हे यहोवा, तू आमच्यामध्ये आहेस,+आणि आम्हाला तुझ्या नावाने ओळखलं जातं.+
आम्हाला सोडून देऊ नकोस.
१० यहोवा या लोकांविषयी म्हणतो: “त्यांना भटकायला आवडतं;+ त्यांनी आपले पाय आवरले नाहीत.+ म्हणून यहोवाला ते जराही आवडत नाहीत.+ त्यामुळे तो आता त्यांचे अपराध आठवणीत आणेल, आणि त्यांच्या पापांचा त्यांच्याकडून हिशोब घेईल.”+
११ मग यहोवा मला म्हणाला: “या लोकांचं भलं व्हावं म्हणून माझ्याकडे प्रार्थना करू नकोस.+
१२ ते उपास करतात तेव्हा मी त्यांचा धावा ऐकत नाही.+ ते होमार्पणं आणि अन्नार्पणं देतात तेव्हा मला जराही आनंद होत नाही.+ मी तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने त्यांचा नाश करीन.”+
१३ तेव्हा मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! संदेष्टे तर त्यांना असं सांगत आहेत, की ‘तुम्ही तलवार किंवा दुष्काळ पाहणार नाही. उलट, देव तुम्हाला या ठिकाणी खरी शांती देईल.’”+
१४ मग यहोवा मला म्हणाला: “संदेष्टे माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करत आहेत.+ मी त्यांच्याशी बोललो नाही, त्यांना पाठवलं नाही किंवा कोणती आज्ञाही दिली नाही.+ ते तुम्हाला भविष्यवाणी म्हणून खोटे दृष्टान्त, शकुन आणि आपल्याच मनातल्या खोट्या गोष्टी सांगत आहेत.+
१५ म्हणून ज्या संदेष्ट्यांना मी पाठवलं नाही आणि जे माझ्या नावाने भविष्यवाणी करत आहेत व असं म्हणत आहेत, की या देशावर तलवार किंवा दुष्काळ पाहायची वेळ येणार नाही, त्या संदेष्ट्यांविषयी यहोवा असं म्हणतो: ‘हे संदेष्टे तलवारीने आणि दुष्काळानेच मरतील.+
१६ आणि ज्या लोकांना ते भविष्यवाणी सांगत आहेत, त्या लोकांची प्रेतं तलवारीमुळे आणि दुष्काळामुळे यरुशलेमच्या रस्त्यांवर पडून राहतील; प्रेतं पुरायलाही कोणी उरणार नाही.+ त्यांची, त्यांच्या बायकांची आणि त्यांच्या मुला-मुलींची एकसारखीच दशा होईल. मी त्यांच्यावर भयंकर संकट आणीन, कारण ते त्याच लायकीचे आहेत.’+
१७ तू त्यांना असा संदेश दे,‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रू वाहू द्या; ते थांबायला नकोत.+
कारण माझ्या कुमारीला, माझ्या लोकांना जबरदस्त तडाखा बसलाय,ते पूर्णपणे चिरडले गेले आहेत+ आणि त्यांना खोलवर जखम झाली आहे.
१८ मी मैदानावर जाऊन बघतो,तर तिथे तलवारीने मरून पडलेल्यांची प्रेतं मला दिसतात;+मी शहरात आलो, तर तिथे मला दुष्काळ आणि रोगराई दिसते.+
कारण संदेष्टे आणि याजक हे त्यांना माहीत नसलेल्या परक्या देशात गेले आहेत.’”+
१९ हे देवा! तू यहूदाला पूर्णपणे नाकारलंय का? तुला सीयोनची किळस आली आहे का?+
तू आम्हाला इतकं का मारलंस, की आम्ही बरे होऊ शकत नाही?+
आम्ही शांतीची आशा धरून होतो, पण काहीच चांगलं झालं नाही.
आम्ही बरं होण्याची वाट पाहत होतो, पण आम्ही घाबरलेलोच आहोत!+
२० हे यहोवा! आम्ही आमचा दुष्टपणा कबूल करतो,आमच्या वाडवडिलांचे अपराध आम्ही मान्य करतो.
कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलं आहे.+
२१ हे देवा! तू आपल्या नावासाठी आमचा त्याग करू नकोस;+आपल्या वैभवी राजासनाला तुच्छ लेखू नकोस.
आमच्याशी केलेला करार आठवणीत ठेव, तो मोडू नकोस.+
२२ राष्ट्रांच्या निरुपयोगी दैवतांपैकी कोणी पाऊस पाडू शकतं का?
किंवा आकाशही स्वतःहून पावसाच्या सरी पाडू शकतं का?
हे आमच्या देवा यहोवा, तुझ्याशिवाय दुसरं कोण हे करू शकतं?+
या सगळ्या गोष्टी करणारा तूच आहेस,म्हणून आमची आशा तुझ्यावर आहे.
तळटीपा
^ किंवा “कुंडांवर.”