लेवीय ८:१-३६

  • अहरोनच्या घराण्याची याजकपदावर नियुक्‍ती (१-३६)

 यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “अहरोन आणि त्याच्या मुलांना आपल्यासोबत घे,+ तसंच, याजकांची वस्त्रं,+ अभिषेकाचं तेल,+ पापार्पणाचा गोऱ्‍हा,* दोन मेंढे आणि बेखमीर* भाकरींची+ टोपलीही घे, ३  आणि सर्व लोकांना भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमव.” ४  तेव्हा यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केलं आणि सर्व लोक भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. ५  मग मोशे त्यांना म्हणाला: “यहोवाने आपल्याला या सर्व गोष्टी करण्याची आज्ञा दिली आहे.” ६  तेव्हा मोशेने अहरोन आणि त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंघोळ घातली.+ ७  त्यानंतर त्याने अहरोनला अंगरखा घातला+ आणि त्याभोवती कमरबंद*+ गुंडाळला. मग त्याने त्याला बिनबाह्‍यांचा झगा+ आणि एफोद*+ घातलं आणि एफोदचा कमरपट्टा+ त्याच्या कमरेला बांधला. ८  नंतर त्याने त्याला ऊरपट*+ घातला आणि त्यात उरीम आणि थुम्मीम*+ ठेवलं. ९  मग त्याने त्याला पगडी घातली+ आणि पगडीच्या समोरच्या बाजूला त्याने सोन्याची चकाकती पट्टी, म्हणजे समर्पणाचं पवित्र चिन्ह*+ लावलं. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. १०  त्यानंतर मोशेने अभिषेकाचं तेल घेऊन उपासना मंडप आणि त्यातल्या सर्व वस्तूंचा अभिषेक केला+ आणि त्यांना पवित्र केलं. ११  मग त्याने थोडं तेल वेदीवर सात वेळा शिंपडलं आणि वेदी व तिची सर्व भांडी, तसंच तांब्याचं मोठं भांडं* व त्याची बैठक यांचा अभिषेक करून त्यांना पवित्र केलं. १२  शेवटी त्याने अभिषेकाचं थोडं तेल अहरोनच्या डोक्यावर ओतलं आणि त्याचा अभिषेक करून त्याला पवित्र केलं.+ १३  मग मोशेने अहरोनच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घातले आणि त्यांभोवती कमरबंद गुंडाळले. त्यानंतर त्याने त्यांना पगड्या घातल्या.*+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. १४  नंतर त्याने पापार्पणाचा गोऱ्‍हा आणला आणि अहरोन आणि त्याच्या मुलांनी पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर हात ठेवले.+ १५  मग मोशेने तो गोऱ्‍हा कापला आणि बोटावर त्याचं रक्‍त+ घेऊन वेदीच्या चारही बाजूला असलेल्या शिंगांना लावलं आणि वेदीला पापापासून शुद्ध केलं. पण उरलेलं रक्‍त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतलं. अशा रितीने वेदीवर प्रायश्‍चित्त करता यावं म्हणून त्याने तिला पवित्र केलं. १६  त्यानंतर मोशेने आतड्यांवरची सगळी चरबी, यकृतावरची चरबी, दोन्ही गुरदे आणि त्यांवरची चरबी घेऊन ती वेदीवर जाळली.+ १७  मग त्याने गोऱ्ह्याचे उरलेले भाग, म्हणजे त्याची कातडी, मांस आणि शेण छावणीबाहेर नेऊन जाळलं.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. १८  नंतर त्याने होमार्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याच्या मुलांनी मेंढ्याच्या डोक्यावर हात ठेवले.+ १९  मग मोशेने तो मेंढा कापला आणि त्याचं रक्‍त वेदीच्या सभोवती शिंपडलं. २०  मोशेने मेंढ्याचे तुकडे केले आणि त्याने त्याचं डोकं व इतर तुकडे आणि गुरद्यांवरची चरबी वेदीच्या आगीवर ठेवली. २१  त्याने मेंढ्याची आतडी व पाय पाण्याने धुतले आणि संपूर्ण मेंढा वेदीवर जाळला. हे सुवासाचं* होमार्पण होतं. ते यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण होतं. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं. २२  मग त्याने दुसरा मेंढा, म्हणजे नियुक्‍तीचा मेंढा+ आणला आणि अहरोन व त्याच्या मुलांनी मेंढ्याच्या डोक्यावर हात ठेवले.+ २३  मोशेने तो मेंढा कापला आणि त्याचं काही रक्‍त घेऊन ते अहरोनच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावलं. २४  त्यानंतर मोशेने अहरोनच्या मुलांना जवळ बोलावलं आणि मेंढ्याचं काही रक्‍त घेऊन ते त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावलं. पण उरलेलं रक्‍त त्याने वेदीच्या सभोवती शिंपडलं.+ २५  मग त्याने मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवरची सगळी चरबी, यकृतावरची चरबी, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरची चरबी आणि उजवा पाय घेतला.+ २६  त्यानंतर त्याने यहोवासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीमधून एक बेखमीर भाकर,+ एक पापडी आणि एक तेल लावलेली भाकर+ घेतली. त्याने त्या भाकरी, चरबीच्या तुकड्यांवर आणि उजव्या पायावर ठेवल्या. २७  मग मोशेने हे सर्व अहरोन आणि त्याच्या मुलांच्या हातांवर ठेवलं आणि ओवाळण्याचं अर्पण म्हणून तो ते यहोवासमोर ओवाळू लागला. २८  त्यानंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातांतून घेऊन वेदीवरच्या होमार्पणावर जाळलं. हे सुवासासाठी* नियुक्‍तीचं बलिदान होतं. हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण होतं. २९  मग मोशेने छातीचा भाग घेऊन तो ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवासमोर ओवाळला.+ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, हा नियुक्‍तीच्या मेंढ्यातून मोशेचा भाग झाला.+ ३०  नंतर मोशेने अभिषेकाचं थोडं तेल+ आणि वेदीवरचं काही रक्‍त घेऊन ते अहरोनवर व त्याच्या वस्त्रांवर, तसंच त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडलं. अशा रितीने त्याने अहरोनला व त्याच्या वस्त्रांना, आणि त्याच्या मुलांना व त्यांच्या वस्त्रांना पवित्र केलं.+ ३१  मग मोशे अहरोनला आणि त्याच्या मुलांना म्हणाला: “हे मांस भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ उकळा+ आणि ते तिथेच टोपलीतल्या* भाकरींसोबत खा. ‘अहरोन आणि त्याच्या मुलांनी ते खावं,’ अशी जी आज्ञा मला देण्यात आली होती, त्याप्रमाणे तुम्ही ते खा.+ ३२  उरलेलं मांस आणि भाकरी जाळून टाका.+ ३३  तुम्हाला याजक म्हणून नियुक्‍त करण्यासाठी* सात दिवस लागतील. म्हणून तुमची नियुक्‍ती पूर्ण करण्याचे दिवस संपेपर्यंत, म्हणजे सात दिवसांपर्यंत तुम्ही भेटमंडपाच्या प्रवेशापासून दूर जाऊ नका.+ ३४  यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे, तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त+ करावं म्हणून आज आपण हे सर्व केलं आहे. ३५  तुम्ही सात दिवसांपर्यंत,+ रात्रंदिवस भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ राहून यहोवासाठीचं आपलं कर्तव्य पूर्ण करा,+ म्हणजे तुम्ही मरणार नाही; कारण तुम्ही हे करावं अशी मला आज्ञा देण्यात आली आहे.” ३६  मग, यहोवाने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोन आणि त्याच्या मुलांनी सर्व गोष्टी केल्या.

तळटीपा

किंवा “तरणा बैल.”
किंवा “कमरपट्टा.”
किंवा “पवित्र मुकुट.”
किंवा “गंगाळ.”
किंवा “बांधल्या.”
किंवा “समाधानाचं.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”
इथे हिब्रू भाषेत “नियुक्‍तीची टोपली” असं म्हणण्यात आलं आहे.
शब्दशः “तुमचा हात भरण्यासाठी.”