शास्ते १९:१-३०

  • बन्यामिनी माणसांचं गिबामधलं घृणास्पद काम (१-३०)

१९  इस्राएलवर कोणीही राजा नव्हता,+ त्या काळात एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातल्या+ दुर्गम भागात एक लेवी राहायचा. त्याने यहूदातल्या बेथलेहेम+ शहरातली एक स्त्री उपपत्नी करून घेतली होती. २  पण त्याची ही उपपत्नी त्याला विश्‍वासू राहिली नाही. आणि एक दिवस, ती त्याला सोडून यहूदातल्या बेथलेहेममध्ये आपल्या वडिलांच्या घरी निघून गेली. तिथे ती चार महिने राहिली. ३  मग तिचा नवरा तिची समजूत घालून तिला परत आणण्यासाठी गेला. त्याने सोबत एक सेवक आणि दोन गाढवं घेतली होती. तो तिथे पोहोचला तेव्हा तिने त्याला आपल्या वडिलांच्या घरात नेलं. त्याला पाहून तिच्या वडिलांना खूप आनंद झाला. ४  त्या मुलीच्या वडिलाने, म्हणजे त्याच्या सासऱ्‍याने त्याला तीन दिवस आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला. त्यामुळे तो लेवी आपल्या सासऱ्‍याकडेच राहिला, आणि तीन दिवस त्यांनी खाणंपिणं केलं. ५  मग चौथ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते जायची तयारी करू लागले. तेव्हा मुलीचे वडील आपल्या जावयाला म्हणाले: “निघायच्या आधी दोन घास खाऊन घ्या, मग जा.” ६  त्यामुळे त्यांनी एकत्र बसून खाणंपिणं केलं. त्यानंतर मुलीचे वडील जावयाला म्हणाले: “आज रात्रीही इथेच मुक्काम करा आणि मजेत राहा.” ७  तरीही तो जायला निघाला. तेव्हा त्याचा सासरा त्याला आग्रह करू लागला. त्यामुळे त्या रात्रीही तो तिथेच राहिला. ८  मग पाचव्या दिवशी पहाटेच उठून तो जायची तयारी करू लागला. तेव्हा मुलीचे वडील त्याला म्हणाले: “निघायच्या आधी दोन घास खाऊन घ्या.” मग बराच वेळ ते खाणंपिणं करत रेंगाळत राहिले. ९  मग तो लेवी आपल्या उपपत्नीला आणि सेवकाला घेऊन जायला निघाला, तेव्हा त्याचा सासरा त्याला म्हणाला: “हे पाहा, आता संध्याकाळ होत आली आहे. माझं ऐका, आज रात्री इथेच थांबा. दिवस मावळायला लागलाय, म्हणून आजची रात्र इथेच मजेत घालवा. मग उद्या सकाळीच उठून तुम्ही आपल्या घरी जायला निघू शकता.” १०  पण त्या लेवीला आणखी एक रात्र तिथे राहण्याची इच्छा नव्हती. म्हणून तो आपली उपपत्नी, सेवक आणि सामान लादलेली दोन गाढवं यांना घेऊन निघाला आणि यबूस, म्हणजे यरुशलेमपर्यंत आला.+ ११  ते यबूसजवळ असताना संध्याकाळ होत आली होती. म्हणून त्या लेवीचा सेवक त्याला म्हणाला: “मालक! आपण यबूसी लोकांच्या या शहरात थांबायचं का? आणि आज रात्री इथेच मुक्काम करायचा का?” १२  पण त्याचा मालक त्याला म्हणाला: “हे विदेशी लोकांचं शहर आहे. इथे कोणी इस्राएली लोक नाहीत. म्हणून इथे थांबायला नको. आपण पुढे गिबापर्यंत जाऊ.”+ १३  मग तो आपल्या सेवकाला म्हणाला: “चला लवकर, आपण गिबा किंवा रामापर्यंत+ पोहोचण्याचा प्रयत्न करू. त्यांपैकीच एका शहरात आपण आज रात्री मुक्काम करू.” १४  म्हणून ते पुढे निघाले. ते गिबाजवळ पोहोचले तेव्हा सूर्य मावळू लागला होता. गिबा हे बन्यामीन वंशाचं शहर होतं. १५  मग ते रात्री मुक्काम करण्यासाठी गिबा शहरात गेले. तिथे जाऊन ते शहराच्या चौकात बसले. पण रात्र घालवण्यासाठी कोणीही त्यांना आपल्या घरी आसरा दिला नाही.+ १६  त्या वेळी एक म्हातारा माणूस आपलं शेतातलं काम संपवून घरी चालला होता. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातला+ असून काही काळापासून गिबामध्ये राहत होता. त्या शहरातले लोक मात्र बन्यामीन वंशाचे होते.+ १७  त्याने पाहिलं, की शहराच्या चौकात कोणी प्रवासी बसला आहे. म्हणून तो त्याला म्हणाला: “तू कुठून आलास? आणि कुठे चाललास?” १८  त्यावर तो लेवी म्हणाला: “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमहून आलो आहोत. आणि एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातल्या दुर्गम भागात चाललो आहोत, कारण मी तिथलाच आहे. मी यहूदाच्या बेथलेहेम शहरात गेलो होतो+ आणि आता यहोवाच्या घराकडे चाललोय.* पण कोणीही मला आसरा द्यायला तयार नाही. १९  आमच्याकडे आमच्या गाढवांसाठी भरपूर चारा आहे.+ आणि माझ्यासाठी, माझ्या उपपत्नीसाठी आणि आमच्या सेवकासाठी आमच्याकडे पुरेशा भाकरी+ आणि द्राक्षारस आहे. तशी खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टींची आमच्याकडे कमी नाही.” २०  तेव्हा तो म्हातारा माणूस त्याला म्हणाला: “माझ्या घरी चला.* तुम्हाला काय हवं काय नको ते मी पाहीन. पण या चौकात मात्र रात्रीचं राहू नका.” २१  त्यानंतर त्याने त्यांना आपल्या घरी आणलं आणि त्यांच्या गाढवांना चारा दिला. मग त्या सर्वांनी आपले पाय धुतले आणि खाणंपिणं केलं. २२  ते गप्पागोष्टी करत निवांत बसले होते. इतक्यात, शहरातले काही गुंड आणि नीच प्रवृत्तीचे पुरुष घराभोवती जमा झाले. ते जोरजोरात दार ठोठावून एकसारखं त्या म्हाताऱ्‍या घरमालकाला म्हणत राहिले: “तुझ्या घरी आलेल्या त्या माणसाला बाहेर आण, म्हणजे आम्ही त्याच्याशी संभोग करू.”+ २३  तेव्हा तो म्हातारा घरमालक बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला: “माझ्या बांधवांनो! मी विनंती करतो, असं दुष्टपणे वागू नका. हा माणूस माझ्या घरी पाहुणा म्हणून आलाय. तेव्हा कृपा करून असलं लज्जास्पद काम करू नका. २४  हे बघा, घरात माझी एक कुमारी मुलगी आणि या माणसाची उपपत्नी आहे. मी त्यांना बाहेर आणतो. तुम्हाला काही करायचंच असेल, तर त्यांच्याशी करा.+ पण या माणसासोबत असलं घाणेरडं काम मात्र करू नका.” २५  पण ती माणसं त्याचं काहीएक ऐकायला तयार नव्हती. तेव्हा त्या लेवीने आपल्या उपपत्नीला+ धरून बाहेर त्यांच्याकडे ढकलून दिलं. त्या माणसांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रात्रभर तिला छळलं. शेवटी, पहाट होऊ लागली तेव्हा त्यांनी तिला सोडून दिलं. २६  मग पहाटे ती स्त्री, तिचा नवरा होता त्या घरी परत आली आणि त्या घराच्या दारात येऊन पडली. दिवस उजाडेपर्यंत, ती तिथेच पडून राहिली. २७  सकाळी तिचा नवरा उठला आणि पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी त्याने दार उघडलं. तेव्हा, त्याची उपपत्नी घराच्या दारात पडलेली त्याला दिसली. तिचे दोन्ही हात दाराच्या उंबरठ्यावर होते. २८  तो तिला म्हणाला: “चल ऊठ, आपल्याला निघायचंय.” पण तिने काहीच उत्तर दिलं नाही, कारण ती मेली होती. म्हणून त्या माणसाने तिला उचलून आपल्या गाढवावर ठेवलं आणि तो आपल्या घरी जायला निघाला. २९  घरी पोहोचल्यावर त्याने एक मोठा सुरा घेतला आणि आपल्या उपपत्नीच्या मृतदेहाचे १२ तुकडे केले. मग, इस्राएलच्या प्रत्येक प्रदेशात त्याने एकेक तुकडा पाठवून दिला. ३०  ज्यांनी ज्यांनी ते पाहिलं त्या सर्वांनी म्हटलं: “इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत असं कधी घडलं नाही आणि कधी पाहण्यातही आलं नाही. आता यावर गांभीर्याने विचार करा, सल्लामसलत करा+ आणि तुम्ही काय ठरवलंय ते सांगा.”

तळटीपा

किंवा कदाचित, “आणि मी यहोवाच्या घरात सेवा करतो.”
शब्दशः “तुला शांती मिळो.”