१ इतिहास १०:१-१४

  • शौल आणि त्याच्या मुलांचा मृत्यू (१-१४)

१०  पलिष्टी लोक इस्राएलशी लढले, तेव्हा इस्राएली माणसांनी पलिष्ट्यांपुढून पळ काढला. आणि अनेक जण गिलबोवा डोंगरावर मरून पडले.+ २  पलिष्टी सैनिक शौलचा व त्याच्या मुलांचा पाठलाग करत त्यांच्या जवळ आले. त्यांनी शौलच्या मुलांना, म्हणजे योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा+ यांना मारून टाकलं. ३  शौलविरुद्ध लढाईचा जोर वाढला, आणि तिरंदाजांनी त्याला गाठून जखमी केलं.+ ४  तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला: “तुझी तलवार काढ आणि मला भोसक. नाहीतर हे बेसुंती* लोक येऊन माझ्याशी निर्दयीपणे वागतील.”*+ पण त्याचा शस्त्रवाहक तसं करायला तयार झाला नाही, कारण तो खूप घाबरला होता. म्हणून मग शौलने स्वतःच आपली तलवार काढली आणि तो तिच्यावर पडला.+ ५  शौल मेला आहे हे पाहून, त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून मेला. ६  अशा प्रकारे शौल, त्याची तीन मुलं, आणि त्याच्यासोबत असलेली त्याच्या घराण्यातली सगळी माणसं मेली.+ ७  इस्राएली सैनिक पळून गेले आहेत आणि शौल व त्याची मुलं मेली आहेत, हे जेव्हा खोऱ्‍यात असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते आपापली शहरं सोडून पळून जायला लागले. नंतर पलिष्टी लोक त्या शहरांमध्ये येऊन राहिले. ८  दुसऱ्‍या दिवशी पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटायला आले, तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याची मुलं मरून पडलेली दिसली.+ ९  मग त्यांनी शौलचं सगळं काही लुटलं आणि त्याचं डोकं कापून त्याच्या अंगावरचं चिलखत* काढून घेतलं. त्यानंतर त्यांनी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशात आपली माणसं पाठवून, मूर्तींच्या+ देवळांत आणि सर्व लोकांत ही बातमी जाहीर केली. १०  त्यांनी शौलचं चिलखत* आपल्या दैवताच्या मंदिरात ठेवलं, आणि त्याचं डोकं दागोनच्या मंदिराला+ टांगलं. ११  पलिष्टी लोकांनी शौलच्या बाबतीत जे काही केलं,+ ते जेव्हा गिलाद इथल्या याबेशमध्ये+ राहणाऱ्‍या लोकांनी ऐकलं, १२  तेव्हा त्यांच्यातले सर्व योद्धे निघाले आणि ते शौल व त्याच्या मुलांचे मृतदेह घेऊन आले. मग त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशमध्ये+ मोठ्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला. १३  अशा प्रकारे, यहोवाशी अविश्‍वासूपणे वागल्यामुळे आणि यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे+ शौलचा मृत्यू झाला. शिवाय, त्याने भूतविद्या करणाऱ्‍या स्त्रीचा सल्ला घेतला होता;+ १४  यहोवाचा सल्ला घेतला नव्हता. म्हणून देवाने त्याला मारून टाकलं आणि त्याचं राज्यपद इशायचा मुलगा दावीद याला दिलं.+

तळटीपा

शब्दार्थसूचीत “सुंता” पाहा.
किंवा “मला वाईट वागणूक देतील.”
किंवा “शस्त्रं.”
किंवा “शस्त्रं.”