१ इतिहास १३:१-१४
१३ दावीदने, हजारांवर व शंभरांवर प्रमुख असलेल्या सर्वांशी, तसंच इतर प्रत्येक प्रमुखाशी सल्लामसलत केली.+
२ मग तो इस्राएलच्या सर्व मंडळीला म्हणाला: “तुम्हाला जर योग्य वाटत असेल आणि आपला देव यहोवा याला मान्य असेल, तर आपण इस्राएलच्या सर्व प्रदेशांतल्या आपल्या बाकीच्या भाऊबंदांना, याजकांना आणि आपापल्या शहरांत* राहणाऱ्या लेव्यांना+ निरोप पाठवून इथे आपल्याकडे बोलावून घेऊ.
३ आणि आपण सर्व जण जाऊन आपल्या देवाच्या कराराची पेटी परत घेऊन येऊ.”+ कारण शौलच्या काळात लोकांनी कराराच्या पेटीकडे दुर्लक्ष केलं होतं.+
४ तेव्हा इस्राएलच्या सर्व मंडळीला ही गोष्ट पटली आणि ते तसं करायला तयार झाले.
५ म्हणून खऱ्या देवाच्या कराराची पेटी किर्याथ-यारीम+ इथून परत आणण्यासाठी, दावीदने इजिप्तच्या नदीपासून* ते लबो-हमाथपर्यंत*+ असलेल्या सर्व इस्राएली लोकांना एकत्र जमवलं.
६ मग दावीद आणि सर्व इस्राएली लोक, करुबांच्या वर* विराजमान असलेला+ खरा देव यहोवा याच्या कराराची पेटी आणण्यासाठी यहूदातल्या किर्याथ-यारीम, म्हणजे बाला+ इथे गेले. त्या पेटीसमोर लोक देवाच्या नावाचा धावा करायचे.
७ पण, त्यांनी खऱ्या देवाच्या कराराची ती पेटी अबीनादाबच्या घरातून काढून नव्या गाडीवर ठेवली.+ आणि उज्जा व अहयो हे दोघं ती गाडी हाकत होते.+
८ दावीद आणि इस्राएलचं संपूर्ण घराणं खऱ्या देवासमोर मोठ्या उत्साहाने जल्लोष करत होतं. ते गाणी गाऊन; तसंच वीणा, डफ,+ झांजा,+ कर्णे+ आणि इतर तंतुवाद्यं वाजवून आनंदोत्सव करत होते.
९ ते कीदोनच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले आणि कराराची पेटी पडायला लागली. म्हणून उज्जाने आपला हात पुढे करून ती धरली.
१० तेव्हा यहोवाचा क्रोध उज्जावर भडकला. त्याने आपला हात पुढे करून कराराची पेटी धरली, म्हणून देवाने त्याला मारून टाकलं+ आणि तो तिथेच देवासमोर मरून पडला.+
११ पण यहोवाचा क्रोध उज्जावर भडकल्यामुळे दावीदला राग आला;* आणि आजपर्यंत ते ठिकाण पेरेस-उज्जा* या नावाने ओळखलं जातं.
१२ त्या दिवशी दावीदला खऱ्या देवाची फार दहशत बसली आणि तो म्हणाला: “मी खऱ्या देवाच्या कराराची पेटी माझ्या इथे कशी काय आणू?”+
१३ म्हणून दावीदने कराराची पेटी आपल्या शहरात, म्हणजे दावीदपुरात आणली नाही; त्याने ती ओबेद-अदोम या गित्ती माणसाच्या घरी नेली.
१४ खऱ्या देवाच्या कराराची पेटी ओबेद-अदोमच्या घरी तीन महिने होती. या काळात, ओबेद-अदोमच्या कुटुंबाला आणि त्याचं जे काही होतं त्या सगळ्याला यहोवा आशीर्वादित करत राहिला.+
तळटीपा
^ शब्दशः “कुरणं असलेल्या शहरांत.”
^ किंवा “शीहोरपासून.”
^ किंवा “हमाथच्या प्रवेशापर्यंत.”
^ किंवा कदाचित, “करुबांच्या मधे.”
^ किंवा “दावीद नाराज झाला.”
^ म्हणजे, “उज्जावर क्रोध भडकला.”