१ इतिहास १४:१-१७
१४ सोरचा राजा हीराम+ याने दावीदकडे आपले दूत पाठवले. त्याने त्यांच्यासोबत, दावीदसाठी राजमहाल बांधायला देवदाराची लाकडंही पाठवली. शिवाय, त्याने सुतारकाम करणाऱ्यांना आणि गवंड्यांनाही पाठवलं.+
२ दावीदला याची जाणीव झाली, की यहोवानेच इस्राएलवर आपलं राज्यपद स्थिर केलं आहे;+ आणि त्यानेच त्याच्या इस्राएली लोकांसाठी आपल्याला एक महान राजा बनवलं आहे.+
३ दावीदने यरुशलेममध्ये आणखी बायका केल्या.+ आणि त्याला आणखी मुलंमुली झाल्या.+
४ यरुशलेममध्ये झालेल्या त्याच्या मुलांची नावं ही:+ शम्मुवा, शोबाब, नाथान,+ शलमोन,+
५ इभार, अलीशवा, एल्पलेट,
६ नोगा, नेफेग, याफीय,
७ अलीशामा, बेल्यादा आणि अलीफलेट.
८ दावीदला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त करण्यात आलं आहे,+ ही गोष्ट जेव्हा पलिष्टी लोकांनी ऐकली तेव्हा ते सगळे त्याच्याशी लढायला आले.+ दावीदला हे समजलं तेव्हा तोही त्यांच्याशी लढायला गेला.
९ इकडे पलिष्टी लोक आले आणि रेफाईम खोऱ्यात+ लूटमार करू लागले.
१० तेव्हा दावीदने देवाला विचारलं: “मी पलिष्ट्यांवर हल्ला करू का? तू त्यांना माझ्या हाती देशील का?” त्यावर यहोवा दावीदला म्हणाला: “जा, त्यांच्यावर हल्ला कर. कारण मी त्यांना नक्की तुझ्या हाती देईन.”+
११ म्हणून दावीद बाल-परासीम+ इथे गेला आणि तिथे त्याने त्यांना मारून टाकलं. मग दावीद म्हणाला: “खरा देव माझ्यापुढे जाऊन पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला आणि त्याने माझ्या हातून शत्रूंचा नाश केला.” त्यामुळे त्या जागेचं नाव बाल-परासीम* असं पडलं.
१२ पलिष्टी लोक आपल्या मूर्ती तिथेच सोडून पळून गेले. आणि दावीदच्या आज्ञेवरून त्या मूर्ती जाळून टाकण्यात आल्या.+
१३ नंतर परत एकदा पलिष्टी लोकांनी खोऱ्यात+ येऊन लूटमार केली.
१४ तेव्हा काय करावं याबद्दल दावीदने पुन्हा देवाला विचारलं. त्यावर खरा देव त्याला म्हणाला: “त्यांच्यावर समोरून हल्ला करू नकोस, तर त्यांना वळसा घालून त्यांच्या पाठीमागे जा. आणि मग तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.+
१५ तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला चाल करून येणाऱ्या सैन्याचा आवाज येईल, तेव्हा लगेच हल्ला कर. कारण पलिष्ट्यांच्या सैन्याचा नाश करायला खरा देव आधीच पुढे गेलेला असेल.”+
१६ तेव्हा, खऱ्या देवाने जसं सांगितलं होतं अगदी तसंच दावीदने केलं.+ आणि तो व त्याचे सैनिक गिबोनपासून गेजेरपर्यंत+ पलिष्ट्यांना तलवारीने मारत गेले.
१७ दावीदची कीर्ती सर्व देशांमध्ये पसरली आणि यहोवाने सगळ्या राष्ट्रांवर दावीदचा धाक बसवला.+
तळटीपा
^ म्हणजे, “तुटून पडण्यात तरबेज असलेला.”