१ इतिहास १८:१-१७
१८ काही काळानंतर, दावीदने पलिष्टी लोकांना हरवून त्यांच्यावर कब्जा केला आणि त्यांच्या हातून गथ+ शहर आणि त्याच्या आसपासची नगरं घेतली.+
२ मग त्याने मवाबी लोकांनाही हरवलं+ आणि मवाबी लोक दावीदचे सेवक बनून त्याला कर* देऊ लागले.+
३ दावीदने सोबाचा+ राजा हदद-एजर+ याला हमाथजवळ+ हरवलं. त्या वेळी, हदद-एजर फरात नदीजवळच्या प्रदेशावर आपला अधिकार मिळवायला चालला होता.+
४ दावीदने त्याचे १,००० रथ, ७,००० घोडेस्वार आणि २०,००० पायदळ सैनिक जिंकून घेतले.+ मग त्याच्या रथांचे १०० घोडे सोडून, दावीदने बाकीच्या सगळ्या घोड्यांच्या पायांच्या शिरा* कापून टाकल्या.+
५ सोबाचा राजा हदद-एजर याची मदत करायला दिमिष्कमधून सीरियाचे लोक आले, तेव्हा दावीदने त्यांचे २२,००० लोक मारून टाकले.+
६ मग दावीदने दिमिष्कच्या सीरियामध्ये सैनिकांच्या चौक्या बनवल्या. आणि सीरियाचे लोक दावीदचे सेवक बनले आणि त्याला कर* देऊ लागले. दावीद जिथे कुठे जायचा तिथे यहोवा त्याला विजय मिळवून द्यायचा.+
७ याशिवाय, दावीदने हदद-एजरच्या सेवकांकडून सोन्याच्या गोलाकार ढालीसुद्धा घेतल्या आणि त्या यरुशलेममध्ये आणल्या.
८ तसंच, दावीद राजाने हदद-एजरच्या टिभथ आणि कून या शहरांमधून अतिशय मोठ्या प्रमाणात तांबं आणलं. पुढे याच तांब्यापासून शलमोनने गंगाळ-सागर,+ स्तंभ आणि तांब्याची भांडी बनवली.+
९ दावीदने सोबाचा+ राजा हदद-एजर+ याच्या संपूर्ण सैन्याला हरवलं आहे, हे जेव्हा हमाथचा राजा तोवू याने ऐकलं,
१० तेव्हा त्याने लगेच आपला मुलगा हदोराम याला दावीद राजाची ख्यालीखुशाली विचारायला, आणि दावीदने हदद-एजरशी लढाई करून त्याला हरवलं म्हणून त्याचं अभिनंदन करायला पाठवलं. (कारण हदद-एजरने अनेकदा तोवूशी लढाई केली होती.) हदोराम आपल्याबरोबर चांदीच्या, सोन्याच्या व तांब्याच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन आला होता.
११ या सगळ्या वस्तू दावीद राजाने यहोवासाठी पवित्र केल्या.+ त्याने अदोम व मवाब या राष्ट्रांतून; तसंच अम्मोनी,+ पलिष्टी+ आणि अमालेकी लोकांकडून आणलेल्या सोन्या-चांदीसोबत या वस्तूही पवित्र केल्या.+
१२ सरूवाचा+ मुलगा अबीशय+ याने क्षार खोऱ्यात १८,००० अदोमी लोकांना ठार मारलं.+
१३ त्याने अदोममध्ये सैनिकांच्या चौक्या बनवल्या आणि सर्व अदोमी लोक दावीदचे सेवक बनले.+ दावीद जिथे कुठे जायचा तिथे यहोवा त्याला विजय मिळवून द्यायचा.+
१४ दावीद संपूर्ण इस्राएलवर राज्य करत राहिला.+ त्याने आपल्या सर्व लोकांवर न्यायाने आणि नीतीने शासन केलं.+
१५ सरूवाचा मुलगा यवाब हा सेनापती होता.+ आणि अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ इतिहास-लेखक होता.
१६ अहीटूबचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे दोघं याजक होते, तर शवूशा हा सचिव होता.
१७ यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी+ आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता. आणि दावीदची मुलं राजाच्या खालोखाल प्रमुख होती.