१ इतिहास १९:१-१९
१९ पुढे अम्मोनी लोकांचा राजा नाहाश याचा मृत्यू झाला. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा राजा बनला.+
२ तेव्हा दावीद म्हणाला: “नाहाशचा मुलगा हानून याच्यावर मी दया* करीन.+ कारण त्याच्या वडिलांनीसुद्धा माझ्यावर दया केली होती.”* हानूनने आपल्या वडिलांना मृत्यूमध्ये गमावलं, म्हणून दावीदने त्याचं सांत्वन करण्यासाठी आपल्या काही दूतांना त्याच्याकडे पाठवलं. पण दावीदचे दूत जेव्हा हानूनचं सांत्वन करायला अम्मोनी लोकांच्या देशात आले,+
३ तेव्हा अम्मोनी लोकांचे अधिकारी हानूनला म्हणाले: “तुम्हाला काय वाटतं, दावीदने खरंच तुमच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि तुमचं सांत्वन करण्यासाठी आपली माणसं पाठवली आहेत काय? नाही! खरंतर, तुमचं राज्य उलथून टाकावं म्हणून देशाची पाहणी व हेरगिरी करायला ते आले आहेत.”
४ त्यामुळे मग हानूनने दावीदच्या सेवकांना पकडून त्यांच्या दाढ्या कापल्या.+ तसंच, त्यांच्या झग्यांचा कमरेखालचा भाग कापून टाकला आणि त्यांना पाठवून दिलं.
५ आपल्या माणसांसोबत जे घडलं ते जेव्हा दावीदने ऐकलं, तेव्हा त्याने लगेच काही माणसांना त्यांना भेटायला पाठवलं. कारण त्यांचा घोर अपमान झाला होता. राजाने आपल्या माणसांच्या हातून त्यांना असा निरोप पाठवला: “तुमच्या दाढ्या वाढत नाहीत तोपर्यंत यरीहोतच+ राहा आणि मग परत या.”
६ काही काळाने अम्मोनी लोकांना समजलं, की दावीद आपला तिरस्कार करू लागला आहे. म्हणून हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या,* अराम-माका आणि सोबा+ इथून भाडोत्री रथ आणि घोडेस्वार घेण्यासाठी त्यांना १,००० तालान्त* चांदी पाठवली.
७ अशा प्रकारे त्यांनी ३२,००० रथ भाड्याने घेतले. तसंच, त्यांनी माकाच्या राजाला आणि त्याच्या लोकांनाही पैसे देऊन बोलावून घेतलं. मग त्यांनी येऊन मेदबा+ इथे छावणी केली. अम्मोनी लोकही आपापल्या शहरांतून बाहेर आले आणि युद्ध करायला एकत्र जमले.
८ ही गोष्ट दावीदच्या कानावर आली, तेव्हा त्याने यवाबला+ आणि आपल्या संपूर्ण सैन्याला, तसंच आपल्या सगळ्यात शूर योद्ध्यांना लढाईला पाठवलं.+
९ मग अम्मोनी लोक बाहेर पडले आणि शहराच्या दरवाजासमोर जाऊन सैन्यदलाप्रमाणे तैनात झाले. आणि युद्धासाठी आलेले राजे दुसरीकडे खुल्या मैदानात उतरले.
१० यवाबने जेव्हा पाहिलं, की शत्रूच्या सैन्याने आपल्याला मागून-पुढून घेरलं आहे, तेव्हा त्याने इस्राएली सैनिकांच्या सगळ्यात चांगल्या तुकड्या निवडल्या आणि सीरियाच्या सैनिकांचा सामना करण्यासाठी त्यांना सैन्यदलाप्रमाणे तैनात केलं.+
११ तर, अम्मोनी लोकांचा सामना करण्यासाठी बाकीच्या सैनिकांना सैन्यदलाप्रमाणे तैनात करता यावं, म्हणून त्याने त्यांना आपला भाऊ अबीशय+ याच्या हाताखाली दिलं.
१२ मग तो म्हणाला: “सीरियाचे लोक+ जर माझ्यावर प्रबळ झाले, तर तू मला मदत करायला ये. आणि जर अम्मोनी लोक तुझ्यावर प्रबळ झाले, तर मी तुला मदत करीन.
१३ आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या शहरांसाठी आपण हिंमत धरून धैर्याने लढूयात;+ आणि यहोवाला जसं योग्य वाटेल तसं तो करेल.”
१४ मग, यवाब आणि त्याची माणसं जेव्हा सीरियाच्या लोकांचा सामना करण्यासाठी पुढे गेली, तेव्हा सीरियाच्या लोकांनी त्यांच्यापासून पळ काढला.+
१५ सीरियाचे लोक पळून गेल्याचं पाहून अम्मोनी लोकांनीही यवाबचा भाऊ अबीशय याच्यापुढून पळ काढला आणि ते आपल्या शहरात गेले. त्यानंतर यवाब यरुशलेममध्ये परत आला.
१६ इस्राएलपुढे आपण हरलो आहोत हे जेव्हा सीरियाच्या लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी आपले दूत पाठवून नदीजवळच्या*+ प्रदेशातल्या सीरियाच्या लोकांना बोलावून घेतलं. ते लोक हदद-एजरचा सेनापती शोपख याच्या नेतृत्वाखाली आले.+
१७ ही खबर मिळताच, दावीदने लगेच सर्व इस्राएलला जमा केलं आणि यार्देन नदी पार करून तो तिथे गेला. सीरियाच्या लोकांचा सामना करण्यासाठी दावीद व त्याचे लोक सैन्यदलाप्रमाणे तैनात झाले आणि ते त्यांच्याशी लढले.+
१८ पण सीरियाच्या लोकांनी इस्राएलपुढून पळ काढला. दावीदने रथांवर स्वार असलेल्या सीरियाच्या ७,००० माणसांना आणि ४०,००० पायदळ सैनिकांना मारून टाकलं. तसंच, त्याने त्यांचा सेनापती शोपख यालाही मारून टाकलं.
१९ इस्राएलने आपल्याला हरवून टाकलं,+ हे हदद-एजरच्या सेवकांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच दावीदसोबत शांतीचा करार केला आणि ते त्याच्या अधीन झाले;+ त्यानंतर सीरियाचे लोक अम्मोनी लोकांना मदत करायला पुन्हा कधीही तयार झाले नाहीत.
तळटीपा
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम केलं होतं.”
^ शब्दशः “अराम-नहराईम.”
^ म्हणजे, फरात नदी.