तीमथ्य याला पहिलं पत्र १:१-२०

  • नमस्कार (१, २)

  • खोट्या शिक्षकांबद्दल इशारा (३-११)

  • पौलला अपार कृपा दाखवण्यात आली (१२-१६)

  • सर्वकाळाचा राजा (१७)

  • एका चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढ (१८-२०)

 आपल्या तारणकर्त्या देवाच्या आणि आपली आशा असलेल्या ख्रिस्त येशूच्या आज्ञेप्रमाणे, ख्रिस्त येशूचा एक प्रेषित, पौल याच्याकडून,+ २  विश्‍वासात माझा निष्ठावान मुलगा+ असलेल्या तीमथ्यला:*+ देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला प्रभू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया आणि शांती मिळो. ३  मी मासेदोनियाला जायला निघालो होतो, तेव्हा मी तुला इफिसमध्ये राहायचं प्रोत्साहन दिलं होतं. आता मी तुला सांगतो, की तिथे असलेल्या काही जणांना, वेगळे सिद्धान्त न शिकवण्याची, ४  तसंच, काल्पनिक कथांकडे आणि वंशावळ्यांकडे लक्ष न देण्याची+ तू आज्ञा दे. कारण अशा गोष्टींमुळे उपयोगाचं असं काहीच साध्य होत नाही.+ आणि विश्‍वास वाढू शकेल अशी कोणतीही गोष्ट देवाकडून मिळण्याऐवजी, फक्‍त शंकाकुशंका उत्पन्‍न होतात. ५  या सूचना* देण्याचा उद्देश इतकाच आहे, की आपण शुद्ध मनाने, चांगल्या विवेकाने आणि निष्कपट विश्‍वासाने+ उत्पन्‍न होणारं प्रेम व्यक्‍त करावं.+ ६  या गोष्टींपासून भरकटून काही जण व्यर्थ गोष्टींवर चर्चा करू लागले आहेत.+ ७  त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक+ व्हायची इच्छा आहे, पण ते ज्या गोष्टी बोलतात किंवा ज्या गोष्टींवर इतकं अडून बसतात, त्या त्यांनाच समजत नाहीत. ८  योग्य प्रकारे* पालन केलं, तर नियमशास्त्र चांगलंच आहे, हे आपल्याला माहीत आहे. ९  शिवाय, नियमशास्त्र हे नीतिमान माणसासाठी देण्यात आलेलं नाही. तर, जे अनीतिमान,+ बंडखोर, अधार्मिक, पापी, बेइमान,* अपवित्र, आईवडिलांची आणि इतरांची हत्या करणारे, १०  अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे, समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष,* अपहरण करणारे, खोटं बोलणारे, खोटी शपथ घेणारे आणि फायदेकारक* शिकवणीच्या+ विरोधात असलेली दुसरी कोणतीही गोष्ट करणारे आहेत, त्यांच्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं आहे. ११  ही शिकवण, आनंदी देवाने मला सोपवलेल्या त्याच्या गौरवी आनंदाच्या संदेशाप्रमाणे आहे.+ १२  मला सामर्थ्य देणारा आपला प्रभू ख्रिस्त येशू याचा मी आभारी आहे. कारण त्याने मला विश्‍वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे.+ १३  खरंतर, मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट माणूस होतो.+ तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली कारण मी अज्ञानामुळे आणि विश्‍वास नसल्यामुळे तसं वागलो. १४  पण, आपल्या प्रभूने मला भरपूर अपार कृपा दाखवली आणि मला ख्रिस्त येशूकडून विश्‍वास आणि प्रेम मिळालं. १५  ही गोष्ट विश्‍वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे, की ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला* जगात आला.+ त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे.+ १६  तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली. हे यासाठी की मी जो सर्वात मोठा पापी, त्या माझ्याद्वारे ख्रिस्त येशूने त्याची सगळी सहनशीलता दाखवावी. तसंच, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी जे त्याच्यावर विश्‍वास ठेवतील,+ अशा सर्वांसमोर माझं उदाहरण ठेवावं. १७  सर्वकाळाचा राजा,+ अविनाशी,+ अदृश्‍य,+ जो एकच देव+ त्याला सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव मिळो. आमेन. १८  तीमथ्य, माझ्या मुला, तुझ्याबद्दल करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांप्रमाणे मी या सूचना* तुला सोपवून देत आहे. म्हणजे तुला एका चांगल्या उद्देशासाठी असलेली ही लढाई लढत राहायला मदत मिळेल.+ १९  तसंच, आपला विश्‍वास आणि चांगला विवेक टिकवून ठेव.+ कारण काहींनी तो नाकारल्यामुळे त्यांच्या विश्‍वासाचं जहाज फुटून उद्ध्‌वस्त झालं आहे. २०  हुमनाय+ आणि आलेक्सांद्र हे त्यांच्यापैकी आहेत आणि मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं आहे.+ हे ताडन मिळाल्यामुळे ते देवाची निंदा न करण्याचा धडा शिकतील.

तळटीपा

म्हणजे “जो देवाचा सन्मान करतो.”
किंवा “हुकूम; आदेश.”
शब्दशः “कायद्यानुसार.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम नसलेले.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.” शब्दशः “पुरुषांसोबत झोपणारे पुरुष.”
ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “लोकांचं तारण करण्यासाठी.”
किंवा “हुकूम; आदेश.”