१ शमुवेल २०:१-४२

  • योनाथान दावीदला एकनिष्ठ राहतो (१-४२)

२०  मग दावीद रामातल्या नायोथमधून पळून गेला. पण तो योनाथानकडे आला आणि त्याला म्हणाला: “मी काय केलंय?+ माझा अपराध काय? मी तुझ्या वडिलांविरुद्ध असं काय पाप केलंय की ते माझा जीव घ्यायला बघत आहेत?” २  त्यावर योनाथान त्याला म्हणाला: “हे शक्य नाही!+ तुला कोणीही मारणार नाही. हे बघ, माझे वडील मला सांगितल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाहीत; मग ती मोठी असो किंवा छोटी. मग ही गोष्ट ते माझ्यापासून का लपवतील? नाही, असं होऊ शकत नाही.” ३  पण दावीद शपथ घेऊन त्याला म्हणाला: “तुझ्या वडिलांना हे चांगलं माहीत आहे की आपण मित्र आहोत.+ म्हणून त्यांनी कदाचित विचार केला असेल, ‘ही गोष्ट योनाथानला कळायला नको, नाहीतर त्याला वाईट वाटेल.’ पण जिवंत देव यहोवाची शपथ आणि तुझ्या जिवाची शपथ, माझ्यामध्ये आणि मृत्यूमध्ये फक्‍त एका पावलाचं अंतर आहे!”+ ४  तेव्हा योनाथान त्याला म्हणाला: “तू जे काही म्हणशील, ते मी तुझ्यासाठी करीन.” ५  त्यावर दावीद योनाथानला म्हणाला: “उद्या नवचंद्राचा दिवस* आहे+ आणि मला राजासोबत जेवायला बसावं लागणार आहे. पण, आता तुझी परवानगी असेल तर मला जाऊ दे. म्हणजे मी तिसऱ्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत शहराबाहेर लपून बसेन. ६  तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल विचारलं तर सांग, ‘दावीदला त्याच्या घरी बेथलेहेमला+ लवकरात लवकर जायचं होतं. कारण त्याला आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत वार्षिक बलिदानात सहभाग घ्यायचा होता.+ आणि म्हणून जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी त्याने मला खूप विनंती केली.’ ७  ते जर म्हणाले ‘ठीक आहे,’ तर असं समज की तुझ्या या सेवकाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पण जर त्यांना राग आला, तर असं समज की ते नक्कीच माझं काही बरंवाईट करणार आहेत. ८  आता आपल्या या सेवकावर दया* कर.+ कारण तू यहोवासमोर आपल्या या सेवकाशी करार केलाय.+ पण जर मी दोषी असेन,+ तर तूच मला मारून टाक. मला तुझ्या वडिलांच्या हाती का देतोस?” ९  यावर योनाथान म्हणाला: “असा विचारही कधी करू नकोस! माझ्या वडिलांनी तुझं काही बरंवाईट करायचं ठरवलं असेल आणि ती गोष्ट जर मला समजली, तर मी तुला सांगणार नाही का?”+ १०  मग दावीद त्याला म्हणाला: “तुझे वडील माझ्यावर रागावले आहेत की नाही ही गोष्ट मला कोण सांगणार?” ११  तेव्हा योनाथान म्हणाला: “चल, आपण दोघं शहराबाहेर जाऊ.” मग ते दोघं शहराबाहेर गेले. १२  पुढे योनाथान दावीदला म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा आपल्यामध्ये साक्षीदार आहे. माझ्या वडिलांच्या मनात काय आहे हे मी तुला उद्या किंवा परवा या सुमारास कळवीन. जर ते तुझ्यावर रागावलेले नसतील तर मी निरोप पाठवून तुला ते कळवीन. १३  आणि त्यांनी तुझं काही बरंवाईट करायचं ठरवलं असेल तर तेही मी तुला कळवीन. मी जर तसं केलं नाही आणि तुला वाचवलं नाही, तर यहोवा मला कठोरातली कठोर शिक्षा करो. यहोवा जसा माझ्या वडिलांसोबत होता,+ तसाच तो तुझ्यासोबतही राहो.+ १४  मी जिवंत असेपर्यंत आणि माझा मृत्यू झाल्यानंतरही तू माझ्यावर यहोवासारखंच एकनिष्ठ प्रेम कर.+ १५  माझ्या घराण्यावर एकनिष्ठ प्रेम करण्याचं कधीही सोडू नकोस;+ यहोवा पृथ्वीवरून तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश करेल अगदी तेव्हाही.” १६  त्यानंतर योनाथानने दावीदच्या घराण्यासोबत एक करार केला. आणि तो म्हणाला, “यहोवा दावीदच्या शत्रूंचा नक्की न्याय करेल.” १७  योनाथानचं दावीदवर प्रेम असल्यामुळे त्याने त्याला त्या प्रेमाच्या आधारावर पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली; कारण त्याचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं.+ १८  योनाथान मग दावीदला म्हणाला: “उद्या नवचंद्राचा दिवस+ आहे आणि तुझी जागा रिकामी राहील. तू नाहीस हे माझ्या वडिलांच्या लक्षात येईल. १९  आणि तिसऱ्‍या दिवशी तर ते नक्कीच तुझ्याबद्दल विचारतील. तू त्या दिवशी* लपला होतास, तसा पुन्हा या ठिकाणी ये आणि या दगडाजवळ थांबून राहा. २०  मग, निशाण्यावर बाण मारत असल्यासारखं दाखवून मी दगडाच्या एका बाजूला तीन बाण सोडीन. २१  आणि मी माझ्या सेवकाला बाण शोधून आणायला पाठवीन. जर मी त्याला म्हणालो: ‘बघ! बाण तुझ्या या बाजूला आहेत. ते घेऊन ये,’ तर तू परत येऊ शकतोस. कारण जिवंत देव यहोवाची शपथ, त्याचा अर्थ असा असेल की सर्वकाही ठीक आहे आणि तुला कोणताही धोका नाही. २२  पण, जर मी सेवकाला म्हणालो: ‘बघ, बाण तुझ्या पलीकडे आहेत,’ तर तू निघून जा. कारण यहोवा तुला पाठवतोय. २३  शिवाय आपण एकमेकांसोबत जो करार केलाय,+ त्याचा यहोवा नेहमीसाठी आपल्यामध्ये साक्षीदार असेल.”+ २४  त्यानंतर दावीद शहराबाहेर लपून राहिला. मग नवचंद्राच्या दिवशी राजा जेवायला आपल्या जागी बसला.+ २५  शौल राजा भिंतीजवळ आपल्या नेहमीच्या जागी बसला होता. त्याच्यासमोर योनाथान, तर त्याच्या बाजूला अबनेर+ बसला होता. पण दावीदची जागा मात्र रिकामी होती. २६  त्या दिवशी शौल काहीच बोलला नाही. कारण तो असा विचार करत होता: ‘कदाचित काही कारणामुळे तो अशुद्ध झाला असेल.+ हो, तो नक्कीच अशुद्ध झाला असेल.’ २७  पण नवचंद्राच्या दुसऱ्‍या दिवशीही दावीदची जागा रिकामीच होती. म्हणून शौल योनाथानला म्हणाला: “काय झालं? इशायचा मुलगा+ कालही आणि आजही जेवायला का आला नाही?” २८  योनाथानने शौलला उत्तर दिलं: “दावीदने खूप विनंती करून बेथलेहेमला+ जाण्यासाठी माझ्याकडे परवानगी मागितली. २९  तो म्हणाला, ‘कृपा करून मला माझ्या शहरात जाऊ दे. कारण शहरात माझं कुटुंब बलिदान अर्पण करणार आहे आणि माझ्या भावाने मला बोलावलंय. तू मला परवानगी देत असशील, तर मी गुपचूप माझ्या भावांकडे जाऊन येतो.’ आणि म्हणून तो राजाच्या मेजावर जेवायला आला नाही.” ३०  तेव्हा शौलचा राग योनाथानवर भडकला. तो त्याला म्हणाला: “अरे बंडखोरा! तुला काय वाटलं मला माहीत नाही का, की तू इशायच्या मुलाची बाजू घेत आहेस? असं करून तू स्वतःची आणि स्वतःच्या आईची बेअब्रू करत आहेस. ३१  जोपर्यंत तो इशायचा मुलगा जिवंतय, तोपर्यंत तू आणि तुझं राज्यपद स्थिर होणार नाही.+ म्हणून आता कोणालातरी पाठव आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये, तो मेलाच पाहिजे.”+ ३२  पण योनाथान आपल्या वडिलांना, शौलला म्हणाला: “तुम्हाला त्याला का मारायचंय?+ त्याने काय केलंय?” ३३  तेव्हा योनाथानला मारण्यासाठी शौलने आपला भाला त्याच्याकडे फेकला.+ यावरून योनाथानला समजलं, की त्याच्या वडिलांनी दावीदला मारून टाकण्याचा निश्‍चय केला आहे.+ ३४  मग, योनाथान रागाच्या भरात लगेच मेजावरून उठला. आणि त्याने त्या दिवशी, म्हणजे नवचंद्राच्या दुसऱ्‍या दिवशी काहीच खाल्लं नाही. कारण, दावीदबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं+ आणि त्याच्या वडिलांनी त्याचा अपमानही केला होता. ३५  मग सकाळी योनाथान ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला शहराबाहेर गेला. त्याच्यासोबत एक तरुण सेवकही होता.+ ३६  तो आपल्या सेवकाला म्हणाला: “धावत जा आणि मी जे बाण मारीन ते शोधून आण.” तेव्हा त्याचा सेवक धावू लागला आणि योनाथानने त्याच्या पलीकडे बाण सोडले. ३७  योनाथानने जिथे बाण मारले होते, तिथे त्याचा सेवक पोहोचला, तेव्हा योनाथान त्याला हाक मारून म्हणाला: “बाण तुझ्या पलीकडे आहेत ना?” ३८  योनाथान पुढे त्याच्या सेवकाला म्हणाला: “लवकर जा! उशीर करू नकोस!” मग तो सेवक बाण घेऊन आपला मालक योनाथान याच्याकडे परत आला. ३९  या सगळ्या गोष्टींचा अर्थ सेवकाला समजला नाही; फक्‍त योनाथान आणि दावीद यांनाच त्याचा अर्थ माहीत होता. ४०  मग योनाथानने आपली शस्त्रं सेवकाला दिली आणि तो त्याला म्हणाला: “हे घेऊन शहरात जा.” ४१  तो सेवक निघून गेला. त्यानंतर, दावीद जवळच ज्या ठिकाणी लपून बसला होता तिथून, म्हणजे दक्षिणेकडून उठला. आणि त्याने तीन वेळा जमिनीपर्यंत वाकून दंडवत घातला. मग त्या दोघांनी एकमेकांचा मुका घेतला आणि ते एकमेकांसाठी रडू लागले; पण दावीद सर्वात जास्त रडला. ४२  योनाथान दावीदला म्हणाला: “शांतीने जा. कारण आपण दोघांनीही यहोवाच्या नावाने अशी शपथ वाहिली आहे,+ की ‘यहोवा तुझ्या-माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशामध्ये आणि माझ्या वंशामध्ये नेहमीसाठी साक्षीदार असो.’”+ मग दावीद तिथून निघून गेला आणि योनाथान शहरात परत आला.

तळटीपा

चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
शब्दशः “कामाच्या दिवशी.”