२ इतिहास १६:१-१४

  • आसाने सीरियासोबत केलेला करार (१-६)

  • हनानी द्रष्टा आसाला फटकारतो (७-१०)

  • आसाचा मृत्यू (११-१४)

१६  आसा राजाच्या शासनकाळाच्या ३६ व्या वर्षी, इस्राएलचा राजा बाशा+ याने यहूदावर हल्ला केला. आणि यहूदाचा राजा आसा याच्या प्रदेशात लोकांचं येणं-जाणं होऊ नये, म्हणून तो रामा+ शहर बांधू लागला.*+ २  तेव्हा, आसाने यहोवाच्या मंदिरातल्या व राजमहालातल्या भांडारांत असलेलं सोनं-चांदी घेतलं,+ आणि ते दिमिष्कमध्ये राहणारा सीरियाचा राजा बेन-हदाद याच्याकडे पाठवलं.+ आसाने त्याला असा संदेश पाठवला: ३  “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यामध्ये जसा एक करार होता, तसाच करार आपण आपसात करू या. मी तुला सोनं-चांदी पाठवतोय. तर आता, इस्राएलचा राजा बाशा याच्याशी तू जो करार केलाय तो मोडून टाक, म्हणजे तो माझा पिच्छा सोडेल.” ४  बेन-हदादने आसा राजाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने आपल्या सेनापतींना इस्राएलच्या शहरांवर हल्ला करायला पाठवलं. त्यांनी जाऊन ईयोन,+ दान,+ आबेल-मईम, तसंच नफतालीच्या+ प्रदेशात असलेली कोठारांची सगळी शहरं जिंकली. ५  बाशाने हे ऐकलं तेव्हा त्याने रामा शहर बांधायचं* लगेच थांबवलं आणि ते काम तसंच सोडून दिलं. ६  मग आसा राजाने यहूदातल्या सर्व लोकांना बोलावलं आणि रामा+ शहर बांधण्यासाठी बाशा जी लाकडं व जे दगड वापरत होता ते त्यांनी उचलून नेले.+ त्यांचा उपयोग करून आसा राजाने मिस्पा+ व गेबा+ ही शहरं बांधली.* ७  तेव्हा हनानी+ द्रष्टा* हा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला: “तू तुझा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी सीरियाच्या राजावर भरवसा ठेवलास, म्हणून सीरियाचा राजा तुझ्या हातून निसटून गेला.+ ८  इथियोपियाचं आणि लिबियाचं सैन्य अफाट नव्हतं का? आणि त्यांच्याकडे बरेचसे रथ आणि घोडेस्वार नव्हते का? पण तरीसुद्धा यहोवाने त्या सगळ्यांना तुझ्या हाती दिलं, कारण तू त्याच्यावर भरवसा ठेवला होतास.+ ९  ज्यांचं मन पूर्णपणे यहोवाकडे लागलेलं असतं,*+ त्यांच्यासाठी आपली शक्‍ती प्रकट करायला* त्याची नजर संपूर्ण पृथ्वीवर असते.+ पण या बाबतीत तू मूर्खपणे वागलास. म्हणून आतापासून तुला सतत युद्धांना तोंड द्यावं लागेल.”+ १०  हनानी द्रष्ट्याचे हे शब्द ऐकून आसा खूप चिडला. त्याला त्याचा इतका राग आला, की त्याने त्याला तुरुंगात टाकलं. तसंच, त्या काळात आसा लोकांना वाईट वागणूक देऊ लागला. ११  आसाबद्दलचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा सगळा इतिहास यहूदामधल्या आणि इस्राएलमधल्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.+ १२  आसाच्या शासनकाळाच्या ३९ व्या वर्षी, त्याच्या पायांना एक रोग झाला आणि त्यामुळे तो खूप आजारी पडला. पण आपल्या आजारपणातसुद्धा त्याने यहोवावर भरवसा ठेवला नाही; तो मदतीसाठी वैद्यांकडे गेला. १३  नंतर, आपल्या शासनकाळाच्या ४१ व्या वर्षी आसाचा मृत्यू झाला.*+ १४  तेव्हा त्यांनी त्याचा मृतदेह बाल्सम तेलाने, तसंच वेगवेगळ्या मसाल्यांच्या व सुगंधी तेलांच्या मिश्रणाने भरलेल्या पलंगावर ठेवला.+ आणि त्याला एका भव्य कबरेत दफन केलं. ही कबर आसाने स्वतःसाठी दावीदपुरात+ खोदून घेतली होती. याशिवाय, त्यांनी त्याच्या सन्मानासाठी एक मोठी आगही पेटवली.*

तळटीपा

किंवा “मजबूत करू लागला; पुन्हा बांधू लागला.”
किंवा “मजबूत करायचं; पुन्हा बांधायचं.”
किंवा “मजबूत केली; पुन्हा बांधली.”
किंवा “त्यांना मदत करायला.”
किंवा “पूर्णपणे यहोवाला समर्पित असतं.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
असं दिसून येतं, की ही आग आसाचा मृतदेह जाळण्यासाठी नाही, तर सुगंधी मसाले जाळण्यासाठी पेटवण्यात आली होती.