२ इतिहास २२:१-१२

  • यहूदाचा राजा अहज्या (१-९)

  • अथल्या राज्यपद बळकावते (१०-१२)

२२  मग यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांनी यहोरामच्या सगळ्यात लहान मुलाला, म्हणजे अहज्याला* त्याच्या जागी राजा बनवलं. कारण, अरबी लोकांसोबत यहूदाच्या छावणीत आलेल्या लुटारूंच्या टोळ्यांनी त्याच्या सगळ्या मोठ्या मुलांना मारून टाकलं होतं.+ म्हणून यहोरामचा मुलगा अहज्या हा यहूदावर राज्य करू लागला.+ २  अहज्या राजा बनला त्या वेळी तो २२ वर्षांचा होता. त्याने एक वर्ष यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अथल्या+ असून ती अम्री+ याची नात* होती. ३  अहज्या हा अहाबच्या घराण्यासारखाच वागला;+ कारण वाईट कामं करायला त्याची आई त्याला सल्ला द्यायची. ४  अहाबच्या घराण्याप्रमाणेच तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला; कारण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्यातले लोक त्याचे सल्लागार बनले होते; आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. ५  त्यांचा सल्ला ऐकून तो इस्राएलचा राजा अहाब याच्या मुलासोबत, म्हणजे यहोरामसोबत सीरियाचा राजा हजाएल+ याच्याशी युद्ध करायला रामोथ-गिलाद+ इथे गेला. पण तिथे तिरंदाजांनी यहोरामला जखमी केलं. ६  म्हणून मग बरं होण्यासाठी तो इज्रेलला+ परत आला; कारण, सीरियाचा राजा हजाएल याच्याशी रामा इथे युद्ध करत असताना त्यांनी त्याला जखमी केलं होतं.+ अहाबचा मुलगा यहोराम+ जखमी झाल्यामुळे,*+ यहूदाचा राजा यहोराम+ याचा मुलगा अहज्या* त्याला भेटायला इज्रेलला गेला. ७  यहोरामला भेटायला जाणं, हे अहज्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. हे सगळं देवानेच घडवून आणलं होतं. यहोरामकडे आल्यावर ते दोघं निमशीचा नातू* येहू+ याला भेटायला गेले. अहाबच्या घराण्याचा नाश करण्यासाठी यहोवाने येहूचा अभिषेक केला होता.+ ८  येहू अहाबच्या घराण्याचा नाश करू लागला, तेव्हा त्याला यहूदाचे अधिकारी आणि अहज्याची सेवा करणारी अहज्याच्या भावांची मुलं भेटली. येहूने या सगळ्यांना मारून टाकलं.+ ९  मग तो अहज्याला शोधू लागला. अहज्या शोमरोनात लपून बसला होता, तेव्हा येहूच्या माणसांनी त्याला धरून येहूकडे आणलं. त्यांनी त्याला मारून टाकलं आणि दफन केलं.+ कारण ते म्हणाले: “ज्याने मनापासून यहोवाची सेवा केली, त्या यहोशाफाटचा हा नातू आहे.”+ अहज्यानंतर त्याचं राज्य चालवायला समर्थ असा कोणीही त्याच्या घराण्यात नव्हता. १०  अहज्याची आई अथल्या+ हिने जेव्हा पाहिलं, की आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिने यहूदाच्या राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं.+ ११  पण राजाच्या ज्या मुलांना मारलं जाणार होतं, त्यांच्यापैकी अहज्याचा मुलगा यहोआश+ याला राजाच्या मुलीने, यहोशबाथने पळवून नेलं. तिने यहोआशला आणि त्याच्या दाईला एका आतल्या खोलीत लपवून ठेवलं. यहोराम+ राजाची मुलगी यहोशबाथ हिने (ही यहोयादा+ याजकाची बायको आणि अहज्याची बहीण होती) यहोआशला अथल्यापासून लपवून ठेवल्यामुळे तो वाचला.+ १२  अथल्या देशावर राज्य करत होती त्या काळात, यहोआश सहा वर्षं खऱ्‍या देवाच्या मंदिरात त्यांच्यासोबत लपून राहिला.

तळटीपा

२इति २१:१७ मध्ये याला यहोआहाज म्हटलं आहे.
शब्दशः “मुलगी.”
काही हिब्रू हस्तलिखितांमध्ये याला “अजऱ्‍या” म्हटलं आहे.
किंवा “आजारी असल्यामुळे.”
शब्दशः “मुलगा.”