२ इतिहास २३:१-२१

  • यहोयादा पुढाकार घेऊन यहोआशला राजा बनवतो (१-११)

  • अथल्याला मारून टाकलं जातं (१२-१५)

  • यहोयादाने घडवून आणलेल्या सुधारणा (१६-२१)

२३  मग सातव्या वर्षी, यहोयादाने धाडस दाखवलं आणि शंभरांवर अधिकारी असलेल्या प्रमुखांसोबत एक करार केला.+ त्याने यरोहामचा मुलगा अजऱ्‍या, यहोहानानचा मुलगा इश्‍माएल, ओबेदचा मुलगा अजऱ्‍या, अदायाचा मुलगा मासेया आणि जिख्रीचा मुलगा अलीशाफाट यांच्याशी करार केला. २  ते सर्व जण यहूदाच्या संपूर्ण प्रदेशात फिरले आणि त्यांनी यहूदाच्या सगळ्या शहरांमधून लेव्यांना+ आणि इस्राएलच्या घराण्यांच्या प्रमुखांना एकत्र जमवलं. ते यरुशलेमला आले तेव्हा, ३  त्या संपूर्ण मंडळीने खऱ्‍या देवाच्या मंदिरात राजासोबत एक करार केला.+ त्यानंतर यहोयादा त्यांना म्हणाला: “पाहा! यहोवाने दावीदच्या वंशजांबद्दल जे वचन दिलं होतं, त्याप्रमाणे राजाचा मुलगा राज्य करेल.+ ४  तुम्ही असं करावं: शब्बाथाच्या दिवशी सेवा करणाऱ्‍या याजकांपैकी आणि लेव्यांपैकी+ एक तृतीयांश जणांनी द्वारपालांचं काम करावं;+ ५  एक तृतीयांश जणांनी राजमहालाजवळ+ आणि एक तृतीयांश जणांनी ‘पाया’ नावाच्या दरवाजाजवळ तैनात व्हावं. बाकीच्या सगळ्या लोकांनी यहोवाच्या मंदिराच्या अंगणांत थांबावं.+ ६  कोणालाही यहोवाच्या मंदिरात येऊ देऊ नका. फक्‍त सेवा करणारे याजक आणि लेवी आत येतील.+ कारण ते पवित्र सेवेसाठी निवडलेले आहेत. बाकीच्या सगळ्या लोकांनी मंदिराच्या बाहेर थांबून यहोवासाठी असलेलं आपलं कर्तव्य पूर्ण करावं. ७  लेवी शस्त्रं घेऊन चारही बाजूंनी राजाचं संरक्षण करतील. कोणीही मंदिरात आला, तर त्याला मारून टाका. आणि राजा जिथे कुठे जाईल तिथे त्याच्यासोबत राहा.” ८  तेव्हा, यहोयादा याजकाने सांगितलं होतं, अगदी तसंच लेव्यांनी आणि यहूदाच्या माणसांनी केलं. त्यांच्यापैकी प्रत्येकाने, शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर असलेल्या आपल्या माणसांना सोबत घेतलं; तसंच, जी माणसं शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर नव्हती त्या माणसांनाही त्यांनी सोबत घेतलं.+ कारण यहोयादा याजकाने कोणत्याही गटाला+ कामावरून सोडलं नव्हतं; त्याने त्यांना थांबवून ठेवलं होतं. ९  यहोयादा याजकाने मग शंभर रक्षकांवर अधिकारी असलेल्या प्रमुखांना,+ खऱ्‍या देवाच्या मंदिरात असलेल्या+ दावीद राजाच्या छोट्या ढाली,* गोलाकार ढाली+ आणि भाले दिले. १०  नंतर त्याने सगळ्या लोकांना हातात शस्त्रं देऊन तैनात केलं. ते मंदिराच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकापर्यंत सगळीकडे तैनात झाले; ते वेदीजवळ आणि मंदिराजवळ, राजाच्या चारही बाजूंना तैनात झाले. ११  मग त्यांनी राजाच्या मुलाला+ बाहेर आणलं. त्यांनी त्याच्या डोक्यावर मुकुट व साक्षपट*+ ठेवून त्याला राजा बनवलं. आणि यहोयादाने व त्याच्या मुलांनी त्याचा अभिषेक केला. नंतर ते अशी घोषणा करू लागले: “राजाला दीर्घायुष्य लाभो!”+ १२  अथल्याने जेव्हा लोकांच्या पळण्याचा आणि राजाचा जयजयकार होत असल्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती लगेच त्या लोकांकडे यहोवाच्या मंदिरात गेली.+ १३  तिने पाहिलं, की राजा प्रवेशद्वाराजवळ त्याच्या स्तंभाशेजारी उभा आहे आणि अधिकारी+ व कर्णे वाजवणारे राजासोबत आहेत. तसंच, देशातले सगळे लोकही जल्लोष करून+ कर्णे वाजवत आहेत. आणि गायक वाद्यं वाजवून स्तुती करण्यात पुढाकार घेत आहेत. हे सर्व पाहून अथल्याने आपले कपडे फाडले आणि ती मोठ्याने ओरडून म्हणाली: “विश्‍वासघात! विश्‍वासघात!” १४  तेव्हा यहोयादा याजकाने शंभर रक्षकांच्या प्रमुखांना, म्हणजे सैन्यावर नेमलेल्या अधिकाऱ्‍यांना बाहेर पाठवून अशी आज्ञा दिली: “तिला पहारेकऱ्‍यांमधून बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारून टाका!” कारण, याजकाने त्यांना आधीच सांगितलं होतं, की “तिला यहोवाच्या मंदिरात ठार मारू नका.” १५  म्हणून त्यांनी तिला पकडून नेलं, आणि राजमहालाच्या ‘घोडा-फाटकाजवळ’ आल्यावर तिला लगेच ठार मारलं. १६  मग यहोयादाने असा एक करार केला, की तो स्वतः, सगळे लोक आणि राजा हे नेहमी यहोवाचे लोक म्हणून राहतील.+ १७  त्यानंतर सर्व लोक बआलच्या मंदिराकडे आले आणि त्यांनी ते मंदिर पाडून टाकलं.+ त्यांनी त्याच्या वेदींचा आणि मूर्तींचा पूर्णपणे चुराडा केला.+ त्यांनी वेदींसमोरच बआलच्या पुजाऱ्‍याला, मत्तानला मारून टाकलं.+ १८  मग यहोयादाने याजकांवर आणि लेव्यांवर यहोवाच्या मंदिराची देखरेख करण्याचं काम सोपवलं; दावीदने यांची वेगवेगळ्या गटांत विभागणी केली होती आणि त्यांना मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे+ यहोवाला होमार्पणं वाहण्यासाठी,+ आणि दावीदच्या सूचनेप्रमाणे आनंदाने गीत गाण्यासाठी यहोवाच्या मंदिरात नेमलं होतं. १९  याशिवाय यहोयादाने यहोवाच्या मंदिराच्या दरवाजांजवळ द्वारपाल नेमले.+ म्हणजे अशुद्ध असलेला कोणीही, मग तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध असो, मंदिरात येणार नाही. २०  नंतर, राजाला यहोवाच्या मंदिरातून राजमहालात घेऊन जाण्यासाठी यहोयादाने शंभर रक्षकांवर प्रमुख असलेल्यांना,+ प्रतिष्ठित माणसांना, लोकांच्या अधिकाऱ्‍यांना आणि देशातल्या सगळ्या लोकांना आपल्यासोबत घेतलं. ते सगळे वरच्या दरवाजातून राजमहालात आले, आणि त्यांनी राजाला राजासनावर+ बसवलं.+ २१  तेव्हा देशातल्या सगळ्या लोकांनी आनंदोत्सव केला. आणि अथल्याला तलवारीने मारून टाकण्यात आल्यामुळे शहर शांत झालं.

तळटीपा

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.
कदाचित देवाचं नियमशास्त्र असलेली गुंडाळी.