पेत्र याचं दुसरं पत्र १:१-२१
१ येशू ख्रिस्ताचा दास आणि प्रेषित, शिमोन पेत्र याच्याकडून, आपल्या देवाच्या आणि तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वाद्वारे ज्यांनी आमच्यासारखा मौल्यवान विश्वास प्राप्त केला आहे,* त्यांना:
२ देव आणि आपला प्रभू येशू यांच्याबद्दलच्या अचूक ज्ञानाद्वारे+ तुमच्यावर अपार कृपेचा आणि शांतीचा वर्षाव होत राहो.
३ कारण, देवाची भक्ती करत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देवाने त्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्याला दिल्या आहेत.* स्वतःच्या गौरवाद्वारे आणि चांगुलपणाद्वारे आपल्याला बोलावणाऱ्या देवाबद्दलचं अचूक ज्ञान+ घेतल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पुरवण्यात आल्या.
४ या गोष्टींद्वारे त्याने आपल्याला मौल्यवान आणि खूप महान अशी अभिवचनं दिली आहेत.*+ हे यासाठी, की त्यांद्वारे आपण देवाच्या गुणांचे भागीदार बनावं.+ कारण चुकीच्या इच्छांमुळे* उत्पन्न होणाऱ्या जगाच्या भ्रष्टतेपासून आपल्याला सुटका मिळाली आहे.
५ याच कारणामुळे, तुमच्या विश्वासात चांगुलपणाची+ भर घालण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करा.+ तसंच, चांगुलपणात ज्ञानाची,+
६ ज्ञानात संयमाची, संयमात+ धीराची, धीरात देवाच्या भक्तीची,+
७ देवाच्या भक्तीत बांधवांबद्दल आपुलकीची आणि बांधवांबद्दलच्या आपुलकीत प्रेमाची भर घाला.+
८ कारण हे गुण जर तुमच्यामध्ये असले आणि ओसंडून वाहिले, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या अचूक ज्ञानाविषयी तुम्ही अक्रियाशील किंवा निष्फळ ठरणार नाही.+
९ पण, ज्याच्यामध्ये हे गुण नाहीत तो आंधळा आहे; तो प्रकाशाकडे पाहत नाही*+ आणि पूर्वी केलेल्या पापांपासून आपल्याला शुद्ध करण्यात आलं होतं, ही गोष्ट तो विसरला आहे.+
१० म्हणून बांधवांनो, बोलावलं जाण्याचा+ आणि निवडलं जाण्याचा जो बहुमान तुम्हाला लाभला आहे, तो टिकवून ठेवण्याचा आणखी जास्त प्रयत्न करा. कारण, जर तुम्ही असं करत राहिलात, तर तुम्ही कधीही अडखळून पडणार नाही.+
११ उलट, आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्या सर्वकाळाच्या राज्यात तुम्हाला मोठ्या गौरवाने प्रवेश मिळेल.+
१२ याच कारणासाठी, मी तुम्हाला सतत या गोष्टींची आठवण करून देईन. अर्थात, तुम्हाला या गोष्टी आधीपासूनच माहीत आहेत आणि तुमच्यामध्ये असलेल्या सत्यात तुम्ही अगदी खंबीर आहात.
१३ तरीसुद्धा, जोपर्यंत मी या मंडपात* आहे,+ तोपर्यंत तुमचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देणं मला योग्य वाटतं.+
१४ कारण, लवकरच माझा हा मंडप काढून टाकला जाईल हे मला माहीत आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानेच ही गोष्ट मला स्पष्टपणे प्रकट केली आहे.+
१५ म्हणून माझ्याकडून मी नेहमी प्रयत्न करत राहीन. हे यासाठी, की मी गेल्यावर, तुम्हाला या गोष्टींची स्वतःला आठवण* करून देता येईल.
१६ आम्ही तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि उपस्थिती यांबद्दल जे सांगितलं, ते चलाखीने रचलेल्या काल्पनिक कहाण्यांच्या आधारावर नव्हतं. तर आम्ही स्वतः त्याच्या वैभवाचे साक्षीदार होतो.+
१७ कारण, देव जो पिता याच्याकडून त्याला सन्मान आणि गौरव मिळाला. त्या वेळी, वैभवशाली तेजातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे, त्याने माझं मन आनंदित केलंय.”+
१८ हो, पवित्र डोंगरावर आम्ही त्याच्यासोबत असताना स्वर्गातून आम्ही हा आवाज ऐकला.
१९ अशा रितीने, भविष्यसूचक वचनावरचा आमचा भरवसा आणखी पक्का झाला आहे; आणि (दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा+ उगवेपर्यंत) एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी, म्हणजे तुमच्या मनात दिव्याप्रमाणे+ प्रकाश देणाऱ्या या वचनाकडे तुम्ही लक्ष देत आहात हे चांगलं आहे.
२० कारण सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, की शास्त्रातली कोणतीही भविष्यवाणी कोणी स्वतःच्या मनाप्रमाणे केलेली नाही.
२१ कारण, भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेप्रमाणे झाली नाही,+ तर माणसं देवाच्या पवित्र शक्तीच्या* मार्गदर्शनाने बोलली.+
तळटीपा
^ किंवा “विश्वास बाळगण्याचा ज्यांना आमच्यासारखाच सन्मान आहे.”
^ किंवा “उदारपणे दिल्या आहेत.”
^ किंवा “उदारपणे दिली आहेत.”
^ किंवा “वासनांमुळे.”
^ किंवा कदाचित, “आंधळा, फक्त जवळचं पाहणारा.”
^ किंवा “तंबूत,” म्हणजे, त्याचं मानवी शरीर.
^ किंवा “उल्लेख.”
^ शब्दार्थसूची पाहा.