२ राजे २४:१-२०

  • यहोयाकीमचं बंड आणि त्याचा मृत्यू (१-७)

  • यहूदाचा राजा यहोयाखीन (८, ९)

  • बाबेलच्या बंदिवासात गेलेला पहिला गट (१०-१७)

  • यहूदाचा राजा सिद्‌कीया; त्याने केलेलं बंड (१८-२०)

२४  यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर+ याने यहूदावर हल्ला केला; आणि यहोयाकीम तीन वर्षं त्याच्या अधीन राहिला. पण तिसऱ्‍या वर्षी त्याने त्याच्याविरुद्ध बंड केलं. २  मग यहोवा सीरियाच्या लोकांच्या, तसंच खास्दी,*+ मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या लूटमार करणाऱ्‍या टोळ्या यहोयाकीमविरुद्ध पाठवू लागला. यहोवाने आपल्या सेवाकांद्वारे, म्हणजे संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे यहूदाचा नाश करण्यासाठी तो या टोळ्यांना पाठवत राहिला.+ ३  यहूदाला आपल्या नजरेसमोरून दूर करण्यासाठी यहोवाच्या आज्ञेवरूनच हे सर्व झालं.+ मनश्‍शेने खूप मोठ्या प्रमाणावर पापं केली होती;+ ४  आणि त्याने संपूर्ण यरुशलेम निर्दोष लोकांच्या रक्‍ताने भरून टाकलं होतं.+ म्हणून यहोवा यहूदाला क्षमा करायला तयार नव्हता.+ ५  यहोयाकीमबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ ६  मग यहोयाकीमचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोयाखीन राजा बनला. ७  बाबेलच्या राजाने, इजिप्तच्या ओढ्यापासून+ फरात नदीपर्यंत+ असलेला इजिप्तचा सगळा प्रदेश काबीज केला होता.+ त्यामुळे, इजिप्तच्या राजाने पुन्हा कधीही आपलं सैन्य देशाबाहेर लढाईसाठी पाठवलं नाही. ८  यहोयाखीन+ राजा बनला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव नेहूष्टा असून ती यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या एलनाथानची मुलगी होती. ९  यहोयाखीन आपल्या वडिलांप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. १०  त्या काळात बाबेलच्या राजाचं, म्हणजे नबुखद्‌नेस्सरचं सैन्य यरुशलेमवर हल्ला करायला आलं, आणि त्या सैन्याने येऊन शहराला वेढा घातला.+ ११  सैन्याने शहराला वेढा घातलेला असताना, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सरही तिथे आला. १२  तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन हा आपले सेवक, अधिकारी, दरबारी आणि आपली आई या सगळ्यांना घेऊन+ बाबेलच्या राजाला शरण गेला;+ बाबेलच्या राजाने आपल्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी यहोयाखीनला बंदी बनवून नेलं.+ १३  त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालात असलेला सगळा खजिना लुटला.+ तसंच, इस्राएलचा राजा शलमोन याने यहोवाच्या मंदिरासाठी जी सोन्याची भांडी बनवली होती,+ त्या सगळ्या भांड्यांचे त्याने तुकडे-तुकडे केले. यहोवाने भविष्यवाणी केली होती त्याप्रमाणेच हे सर्व घडलं. १४  नबुखद्‌नेस्सरने यरुशलेममधल्या सगळ्यांना, म्हणजे सर्व अधिकारी,*+ शूर योद्धे आणि सर्व कारागीर व लोहार* यांना बंदी बनवून नेलं;+ अशा एकूण १०,००० जणांना त्याने बंदी बनवून नेलं. देशात फक्‍त गरीब व कंगाल लोक उरले.+ १५  अशा प्रकारे, बाबेलच्या राजाने यहोयाखीन+ राजाला, त्याच्या आईला, बायकांना, दरबाऱ्‍यांना आणि देशातल्या सगळ्या प्रतिष्ठित माणसांना यरुशलेममधून बाबेलला बंदिवासात नेलं.+ १६  याशिवाय, त्याने सर्व ७,००० योद्धे आणि १,००० कारागीर व लोहार* यांनाही बंदी बनवून बाबेलला नेलं. ही सगळी माणसं शूरवीर असून युद्धासाठी प्रशिक्षित केलेली होती. १७  बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याह याला यहोयाखीनच्या जागी राजा बनवलं.+ त्याने त्याचं नाव बदलून सिद्‌कीया असं ठेवलं.+ १८  सिद्‌कीया राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्‍या यिर्मयाची मुलगी होती. १९  यहोयाखीनप्रमाणेच सिद्‌कीया यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ २०  यरुशलेममध्ये आणि यहूदामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता; आणि शेवटी त्याने त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करून टाकलं.+ पुढे सिद्‌कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+

तळटीपा

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
किंवा “राजपुत्र.”
किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”
किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”