जागे राहा!
जगभरातल्या तापमानात भीषण वाढ—बायबल काय म्हणतं?
जुलै २०२२ या महिन्यात जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेने सगळे रेकॉर्ड मोडले:
“चायनामध्ये या महिन्यात आलेल्या दुसऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे जवळपास ७० शहरांना अति-सावधानतेचा इशारा देण्यात आला.”—२५ जुलै २०२२, सीएनएन वायर सर्विस.
“उष्णतेच्या लाटेमुळे युरोपमध्ये जागोजागी वणवे पेटले.”—१७ जुलै २०२२, द गार्डियन.
“अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर, दक्षिणेच्या आणि मध्य-पश्चिम भागांमध्ये उष्णतेची लाट उसळली. त्यामुळे रविवारी अनेक शहरांमध्ये तापमानाचे सगळे रेकॉर्ड मोडले.”—२४ जुलै २०२२, द न्यु यॉर्क टाइम्स.
या सगळ्याचा काय अर्थ होतो? भविष्यात माणसांना या पृथ्वीवर राहणं अशक्य होईल का? बायबल काय म्हणतं?
उष्णतेच्या लाटा बायबलची भविष्यवाणी पूर्ण करत आहेत का?
हो. बायबलमध्ये आपल्या काळात ज्या घटना घडतील असं सांगितलं होतं, ते जगभरात येत असलेल्या उष्णतेच्या लाटांनाही लागू होतं. उदाहरणार्थ, येशूने अशी भविष्यवाणी केली होती की, आपल्याला “भयानक दृश्यं” किंवा “विचित्र आणि घाबरवून टाकणाऱ्या गोष्टी” दिसतील. (लूक २१:११; गुड न्यूज ट्रान्सलेशन) माणसं पर्यावरणाचं जे नुकसान करत आहेत त्यामुळे जगभरातलं तापमान वाढतंय. म्हणून अनेकांना अशी भीती वाटते की माणसं या पृथ्वीचा लवकरच नाश करतील.
माणसांना या पृथ्वीवर राहणं खरंच अशक्य होईल का?
नाही. माणसांना या पृथ्वीवर कायम राहता यावं यासाठी देवाने ही पृथ्वी बनवली आहे. (स्तोत्र ११५:१६; उपदेशक १:४) तो माणसांना कधीही या पृथ्वीचा नाश करू देणार नाही. उलट त्याने असं वचन दिलंय, की तो “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश” करेल.—प्रकटीकरण ११:१८.
देवाने आणखी कोणत्या गोष्टी करण्याचं वचन दिलंय याबद्दल बायबलमधल्या दोन भविष्यवाण्या पाहू:
“ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल, वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.” (यशया ३५:१) देव या पृथ्वीला वाळवंट बनू देणार नाही. उलट तो पृथ्वीची झालेली हानी भरून काढेल.
“तू पृथ्वीची काळजी घेतोस, तिला सुपीक आणि फलदायी करतोस.” (स्तोत्र ६५:९) देवाच्या आशीर्वादाने ही पृथ्वी एका सुंदर बागेसारखी होईल.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे बायबलमधली भविष्यवाणी कशी पूर्ण होते हे जाणून घेण्यासाठी, “धरती के भविष्य की बागडोर—किसके हाथों में?” हा हिंदीमधला लेख वाचा.
ही पृथ्वी एका सुंदर बागेसारखी बनेल, ही बायबलमधली भविष्यवाणी कशी पूर्ण होईल हे जाणून घेण्यासाठी “एक सुंदर नवीन जग जवळ आहे!” हा लेख वाचा.