जागे राहा!
धर्म आणि युक्रेनमधलं युद्ध—बायबल काय म्हणतं?
धार्मिक पुढाऱ्यांबद्दल आणि युक्रेनमधल्या युद्धाबद्दल काही बातम्या पाहा:
“रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख, पॅट्रियॅक किरिल यांनी रशियाने केलेल्या हल्ल्याबद्दल एकही शब्द उच्चारलेला नाही. . . . त्यांच्या चर्चने युक्रेनबद्दल जे मत पसरवलं, त्याचा [आधार घेऊन] पुतिनने आपलं युद्ध योग्य ठरवलं.”—इ. यु. ऑबझरवर, ७ मार्च, २०२२.
“पॅट्रियॅक किरिल यांनी . . . युक्रेनविरुद्धचं युद्ध योग्य ठरवत, आतापर्यंतचं सर्वात जबरदस्त विधान केलं. त्यांनी या युद्धाला पापाविरुद्ध लढाई असं म्हटलं.”—ए. पी. न्युज, ८ मार्च, २०२२.
“युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चचे नेते, क्यीव इथे राहणारे मेट्रोपोलिटन एफिफॅनियस पहिले यांनी सोमवारी आपल्या लोकांना ‘रशियाच्या सैनिकांविरुद्ध लढण्यासाठी’ आशीर्वाद दिला. . . . [ते] असंही म्हणाले, की रशियाच्या सैनिकांना मारून टाकणं पाप नाही.”—जेरुसलेम पोस्ट, १६ मार्च, २०२२.
“आम्ही [UCCRO] युक्रेनच्या सैन्याला आणि आमच्या वतीने लढणाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देतो. आमच्यावर हल्ला करणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी आम्ही त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.”—(UCCRO) a यु.सी.सी.आर.ओ स्टेटमेंट, २४ फेब्रुवारी, २०२२.
तुम्हाला काय वाटतं? येशू ख्रिस्ताला मानण्याचा दावा करणाऱ्या धर्मांनी आपल्या सदस्यांना युद्धासाठी जायला प्रोत्साहन देणं योग्य आहे का? याबद्दल बायबल काय म्हणतं?
इतिहासात युद्धांमध्ये धर्माची भूमिका
बरेच धर्म शांतीसाठी झटत असल्याचा दावा करतात. पण इतिहास पाहिल्यावर कळतं, की या धर्मांनी बऱ्याचदा युद्धांना मान्यता दिली आहे, योग्य ठरवलंय, इतकंच काय तर त्यांना बढावासुद्धा दिलाय. अनेक वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार त्यांचा ढोंगीपणा उघड करत आले आहेत. आमच्या प्रकाशनांमधली याची काही उदाहरणं पाहा.
इंग्रजीतल्या एका सावध राहा! मध्ये “धर्मयुद्धं—एक फसवं मृगजळ” या लेखामधून कळतं की देवाच्या आणि ख्रिस्ताच्या नावावरून रोमन कॅथलिक चर्चने किती मोठ्या प्रमाणावर कत्तल केली आहे.
इंग्रजीतल्या आणखी एका सावध राहा! मध्ये “आफ्रिकेतलं कॅथलिक चर्च” या लेखात, नरसंहार आणि जातीसंहार टाळायला धर्म कशा प्रकारे अयशस्वी ठरलाय, याबद्दल सांगितलं आहे.
“धर्म दोषी आहे का?,” “मानवी युद्धांमध्ये धर्मांची भूमिका” आणि “धर्म जेव्हा एकाच पक्षाची बाजू घेतो,” या इंग्रजीतल्या लेखांमधून कळतं, की कॅथलिक, ऑर्थोडॉक्स आणि प्रोटेस्टंट चर्चच्या पाळक वर्गाने अनेक युद्धांमध्ये दोन्ही बाजूंना कसा पाठिंबा दिलाय.
ख्रिस्ती धर्मांनी युद्धाला पाठिंबा दिला पाहिजे का?
येशूने काय शिकवलं: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” (मत्तय २२:३९) “आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा.”—मत्तय ५:४४-४७.
विचार करा: येशूची ही आज्ञा पाळण्याचा दावा करणारे धर्म आपल्या सदस्यांना युद्धात इतरांना मारण्याचं प्रोत्साहन देतात. मग, ते खरंच येशूची आज्ञा पाळत आहेत असं आपण म्हणू शकतो का? उत्तर जाणून घेण्यासाठी इंग्रजीतला, “खरे ख्रिस्ती आणि युद्ध” आणि हिंदीतला, “क्या अपने दुश्मनों से प्यार करना मुमकिन है?” हा लेख पाहा.
येशू काय म्हणाला: “माझं राज्य या जगाचं नाही. जर माझं राज्य या जगाचं असतं, तर मला यहुद्यांच्या हवाली केलं जाऊ नये म्हणून माझे सेवक लढले असते.” (योहान १८:३६) “जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.”—मत्तय २६:४७-५२
विचार करा: पहिल्या शतकात जर येशूचं संरक्षण करण्यासाठीही ख्रिश्चनांना शस्त्रं हातात घ्यायची नव्हती, तर आता इतर कोणत्याही कारणासाठी ते शस्त्रं हाती घेऊ शकतात का? पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी येशूची ही शिकवण कशी पाळली आणि त्याचं अनुकरण कसं केलं हे जाणून घेण्यासाठी, “ख्रिश्चनांनी युद्धात भाग घेतला पाहिजे का?” हा इंग्रजीतला लेख पाहा.
युद्धाला पाठिंबा देणाऱ्या धर्मांचं काय होईल?
बायबल म्हणतं, की जे धर्म येशूची आज्ञा पाळण्याचा दावा करतात, पण त्याच्या शिकवणींप्रमाणे चालत नाहीत, त्यांना देव नाकारतो.—मत्तय ७:२१-२३; तीत १:१६.
प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं आहे, की देव अशा धर्मांना, “पृथ्वीवर वध करण्यात आलेल्या” सर्वांच्या रक्तासाठी दोषी ठरवेल. (प्रकटीकरण १८:२१, २४) देव असं का करेल, हे जाणून घेण्यासाठी “मोठी बाबेल कोण आहे?” हा इंग्रजीतला लेख वाचा.
येशूने म्हटलं, जसं खराब फळ देणाऱ्या किडक्या ‘झाडाला कापून आगीत टाकलं जातं,’ तसंच, देव वाईट कामं करणाऱ्या सगळ्या धर्मांचा नाश करेल. (मत्तय ७:१५-२०) हे कसं होईल हे माहीत करून घेण्यासाठी, “धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?” हा लेख वाचा.
Photo credits, left to right: Photo by Sefa Karacan/Anadolu Agency/Getty Images; Maxym Marusenko/NurPhoto via Getty Images
a UCCRO किंवा युक्रेनियन काउंसिल ऑफ चर्चेस ॲन्ड रिलिजियस ऑर्गनायझेशन्स यात १५ चर्च आहेत. यांमध्ये ऑर्थोडॉक्स, ग्रीक आणि रोमन कॅथलिक, प्रोटेस्टंट आणि इवॅन्जलिकल पंथांचे चर्च आहेत. तसंच यात यहुदी आणि मुसलमान पंथांचे प्रतिनिधीसुद्धा आहेत.